नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर तुर्भे उड्डाणपुलावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कंटेनर पलटी झाला. यामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गीकेवरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघातामुळे वाशीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
तुर्भे पुलाच्या उतारावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर पलटी झाला. कंटेनरवरील लोखंडी कॉईलही रस्त्यावर पडली. यामुळे रोडवरील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलीस चौकीजवळच अपघात झाल्यामुळे पोलिसांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले. कंटेनर रोडमधून बाजूला काढला. लोखंडी कॉईल काढण्याचे कामही सुरू करण्यात आले होते. अपघातामुळे तुर्भे पूल ते सानपाडा सिग्नल व वाशी दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर अडकलेली वाहने तुर्भे गावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु गावातून बाहेर येणारी वाहने व बाहेरून आत येणारी वाहने यामुळे दोन्ही बाजूला चक्काजाम झाले होते.वाहतूक कोडी सोडविण्यासाठी वाशीच्या दिशेने येणारी हलकी वाहने पामबीच रोडवरून वळविण्यात आली होती.
महामार्गावर तुर्भे पुलाच्या उतारावर कंटेनर पलटी होऊन लोखंडी काईलही रोडवर खाली पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. कंटेनर व कॉईल बाजूला काढण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले.नितीन गिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुर्भे वाहतूक