कळंबोली : लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत असून उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, या काळात निवडणुका होत आहे, त्या काळात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. त्यामुळे अनेक कुटुंबे गावी रवाना झालेले असतात. अशा कुटुंबांना मतदानासाठी थांबवायचे कसे? असा प्रश्न समोर येत आहे.मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय आपली व्होटबँक सांभाळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही प्रयत्न करीत आहेत. मावळ मतदार संघात पनवेल विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. याठिकाणी भाजपा व शेका पक्षाची ताकद मोठी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात नाहीत. भाजपा-सेनेची युती झाल्याने खासदार श्रीरंग बारणे यांना युतीतर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेससह शेकाप आघाडीत सहभागी झाले असून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सुटी काळात निवडणुका होत असल्याने जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष व उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या क्र मांकाच्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. एप्रिल महिन्यात सुटी असल्याने नोकरी व्यवसाय करणाऱ्यांकडून लग्न- समारंभ, सहली, गावी जाण्याचे बेत आखले जातात. पनवेल परिसरात महसूल गावे सोडून दिली तर बाकी सर्व शहरी वसाहती आहेत. येथे नोकरी, धंदा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि ते निर्णायक भूमिका बजावणारे मतदार आहेत. उन्हाळ्यात सुटी सुरू झाल्यानंतर बहुतांश सिडको वसाहतीत शुकशुकाट असतो. अनेक घरांना कुलूप असते. नेमका याच काळात निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे आणि खारघर येथे उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांतील खूप लोक राहतात. त्यांची नावे मतदार यादीत आहेत. मात्र, शाळा-महाविद्यालयांना सुटी लागताच अनेक जण मूळ गावी जातात. त्यासाठी तीन-चार महिने आधीपासूनच तिकीट बुकिंगही झालेले असते. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.६० टक्के मतदार बाहेरचेपनवेल विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या जवळपास साडेपाच लाख इतकी आहे. यापैकी ६० टक्के मतदार नोकरी-व्यवसायानिमित्त याठिकाणी वास्तव्यास असलेले आहेत. त्यामध्ये २० ते २५ टक्के परराज्यातील आहेत, तर उरलेले ३५ ते ४० टक्के मतदार हे राज्यातील इतर जिल्ह्यातील आहेत.
उन्हाळी सुटीवर जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:51 AM