स्मार्ट सिटीत वाहनतळ उभारण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:41 AM2018-04-10T02:41:48+5:302018-04-10T02:41:48+5:30
देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा दावा करणाऱ्या नवी मुंबईसह पनवेलमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडकोने वाहनतळांसाठी पुरेसी जागा राखीव ठेवली नाही.
- सूर्यकांत वाघमारे, वैभव गायकर
नवी मुंबई / पनवेल : देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा दावा करणाऱ्या नवी मुंबईसह पनवेलमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडकोने वाहनतळांसाठी पुरेसी जागा राखीव ठेवली नाही. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये एकही वाहनतळ उभारण्यात आले नाही. परिणामी रोड व पदपथावर वाहने उभी करावी लागत आहेत. पार्किंग हीच दोन्ही महापालिकांसमोरील मुख्य समस्या बनली आहे.
देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ठाणे-बेलापूर एमआयडीसीची ओळख आहे. हजारो ट्रक व कंटेनर या परिसरामध्ये येत असतात. परंतु अवजड वाहने उभी करण्यासाठी एकही वाहनतळ उभारण्यात आलेला नाही. एमआयडीसी प्रशासनाने भूखंड विक्री करून पैसे कमविण्यावर भर दिला आहे. पण येथे येणारी वाहने उभी करण्याची काहीही व्यवस्था केलेली नाही. परिणामी सर्व वाहने रोडवर उभी करावी लागत आहेत. शिरवणे व नेरूळ एमआयडीसीमध्ये तेल कंपन्यांचे टँकर रोडवरच उभे केले जात आहेत. रोडच्या दोन्ही बाजूला दोन्ही रांगेत अवजड वाहने उभी केली जात आहेत. हीच स्थिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये आहे. सिडकोने एपीएमसीमध्ये एकमेव ट्रक टर्मिनल उभारले आहे. पण बाजार समितीमध्ये रोज ५ हजारपेक्षा जास्त वाहने येत असतात व ट्रक टर्मिनलमध्ये जास्तीत जास्त ५०० वाहने उभी राहू शकतात. जागाच नसल्याने सर्व वाहने एपीएमसी, मॅफ्को मार्केट, वाशी-तुर्भे रोड, पोलीस स्टेशन परिसरामध्ये उभी करावी लागत आहेत. तळोजा एमआयडीसी व कळंबोली स्टील मार्केटमध्येही अवजड वाहने उभी करण्यासाठी पुरेसी जागा नाही. परिणामी रोडवर अवजड वाहने उभी करावी लागत आहेत.
नवी मुंबईमध्ये सद्यस्थितीमध्ये ३,९२,९८७ वाहने आहेत. पनवेलमध्ये ४ लाख २४ हजार ६०० वाहने आहेत. प्रत्येक वर्षी दोन्ही महापालिका क्षेत्रात जवळपास ७० ते ८० हजार वाहनांची नोंदणी होत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. परिणामी जिथे जागा मिळेल तिथे वाहने उभी केली जात आहेत. शहरातील प्रत्येक रोडवर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात आहेत. नो पार्किंगच्या बोर्डला लागूनच वाहने उभी करावी लागत आहे. प्रत्येक सोसायटीच्या बाहेर रोडवर वाहने उभी करावी लागत आहे. परिणामी मुख्य रोडवर सर्व्हिस रोडवरही वाहतूककोंडी होत आहे. पूर्वीच्या पनवेल नगर परिषद हद्दीत सर्वात गंभीर स्थिती आहे. वाहने उभी करायची कुठे असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. वाहतूक पोलीस सिडको व महापालिकांकडे वाहनतळ विकसित करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. पण पोलिसांच्या सूचनांना केराची टोपली दाखविली जात असून पार्किंगवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
पनवेलमधील पार्किंग समस्येची ठिकाणे
तहसील कार्यालय, जुने भाजी मार्केट, लाइन आळी, पनवेल बाजार समिती, पनवेल रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड, खांदा कॉलनी शिवाजी चौक, स्टील मार्केट कळंबोली, खारघर हिरानंदानी.
नवी मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, सानपाडा, नेरूळ रेल्वे स्टेशन, वाशी सेक्टर १७ ते कोपरखैरणे रोड, घणसोली सेक्टर ४ ते ५ रोड, घणसोली सिंप्लेक्स परिसर, कोपरखैरणे माथाडी वसाहत, सर्व गावठाण परिसर, ऐरोली सहकार बाजार मार्ग, सीवूड रेल्वे स्टेशन समोर.
पोलिसांच्या सूचनांना केराची टोपली
पार्किंग समस्या सोडविण्यासाठी जास्तीत जास्त वाहनतळांची निर्मिती करावी. बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावेत अशा सूचना वाहतूक पोलिसांनी वारंवार सिडको व महापालिका, एमआयडीसी प्रशासनाला केल्या आहेत. पार्किंगची समस्या असणाºया प्रत्येक ठिकाणासाठी काय उपाययोजना कराव्या यासाठी पत्रव्यवहार केले आहेत. परंतु सिडको, महापालिका व एमआयडीसी प्रशासन ही समस्या सोडविण्यासाठी गांभीर्याने लक्ष देत नाही.
वाहनांचा प्रकार नवी मुंबई पनवेल
दुचाकी १८९३६९ २१८३४६
कार १०८४६३ १०२६५१
जीप ४०७५ ४६७
टॅक्सी २८४८ १६७
टुरीस्ट कॅब १०४१५ ९७३७
रिक्षा १८१३९ २१३६८
स्टेज कॅरेजेस २६९ ९२
मिनी बस ३६९१ ५४३
स्कूल बस ८६२ १४५८
प्रायव्हेट सर्व्हिस व्हेईकल ३६५ २४७
रूग्णवाहिका ३११ ३४७
आर्टीक्युलीटेड ४६५५ २३४०८
ट्रक, लॉरी १६९४६ २९०८६
टँकर ५०२८ २४९६
डिलीव्हरी व्हॅन १८११७ १२११४
टॅक्टर ६८ ३१२
ट्रेलर ३५६० ८७
इतर २४५ १६७४
एकूण ३९२९८७ ४२४६००