अमली पदार्थमुक्तीचे आव्हान; नवी मुंबईतील उद्याने, मैदाने, मोकळ्या इमारती बनल्या गर्दुल्ल्यांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 01:23 PM2021-10-30T13:23:57+5:302021-10-30T13:24:18+5:30

Navi Mumbai : नेरूळ बालाजी  टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये गांजाची विक्री केली जात आहे. बेलापूर कोकण भवन परिसरातील झोपडपट्टीमध्येही गांजा विक्री होते.

The challenge of drug detoxification; Gardens, grounds, vacant buildings in Navi Mumbai became a haven for gangsters | अमली पदार्थमुक्तीचे आव्हान; नवी मुंबईतील उद्याने, मैदाने, मोकळ्या इमारती बनल्या गर्दुल्ल्यांचे अड्डे

अमली पदार्थमुक्तीचे आव्हान; नवी मुंबईतील उद्याने, मैदाने, मोकळ्या इमारती बनल्या गर्दुल्ल्यांचे अड्डे

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : शहरातील उद्यानांसह मैदाने व झोपडपट्टी परिसर अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. मध्यरात्री उशिरापर्यंत अनेक तरूण गांजा व इतर अमली पदार्थांचे सेवन  करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. तरूणाई नशेच्या आहारी जात असून, अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. 

देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. सुरक्षित शहरांमध्येही या परिसराची ओळख होती. परंतु मागील काही वर्षांपासून पनवेल, उरण व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गांजा व इतर अमली  पदार्थांची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तरूणाई  अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकू लागली आहे. शहरातील उद्याने, मैदाने, मोकळे भूखंड व मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये गांजा व इतर अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. 

नेरूळ बालाजी  टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये गांजाची विक्री केली जात आहे. बेलापूर कोकण भवन परिसरातील झोपडपट्टीमध्येही गांजा विक्री होते. एपीएमसी, तुर्भे स्टोअर, तुर्भे नाका, कोपरखैरणे परिसरातही अनेक ठिकाणी गांजाची विक्री केली जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. नेरूळ सेक्टर २०चा तलाव, सारसोळे मैदान व इतर ठिकाणीही मध्यरात्रीपर्यंत तरूण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.      

अमली पदार्थ, गुटखा व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा अवैध प्रकार वेळेत थांबवला नाही तर भविष्यात शहरातील तरूणाईला त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतील. अनेक महाविद्यालयीन तरूण गांजासह इतर अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी मागील  आठवड्यापासून अमली पदार्थ ओढणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. 

गांजा ओढणाऱ्यास अटक 
कोपरखैरणे सेक्टर १९ ए मधील महावीर अपार्टमेंटच्या मागील बाजुला पंकज वर्मा या युवकाला गस्तीवरील पोलीस पथकाने पकडले. त्याच्याकडे चिलीम, माचीस व इतर साहित्य सापडले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा प्राशन केला असल्याचे निदर्शनास आले. २८ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता ही कारवाई झाली.

दोघांवर गुन्हा दाखल
कोपरखैरणे सेक्टर १९ ए मधील नॅशनल अपार्टमेंटजवळ २७ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजता दोन तरूण गांजा ओढत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे चिलीम व गांजा ओढण्यासाठी लागणारे इतर साहित्य आढळून आले. मोहमद अन्सारी व मुकेश पांडे अशी दोघांची नावे आहेत. 

विद्यार्थी ताब्यात
नेरूळ सेक्टर २मधील मैदानामध्ये झाडाच्या आडोशाला १९ वर्षाचा तरूण गांजा ओढत असल्याचे गुरुवारी मध्यरात्री आढळून आले. त्याच्याकडे अर्धवट जळालेला गांजा व इतर साहित्य आढळून आले असून, त्याच्या विरोधात नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांची कारवाई
नेरूळमधील सारसोळे येथील श्री गणेश रामलीला मैदान, ज्येष्ठ नागरिक भवनसमोरील मैदानाच्या भिंतीच्या लगतच्या परिसरात अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. गुरुवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास या परिसरातून गांजा ओढत असलेल्या अक्षय डांगे याला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The challenge of drug detoxification; Gardens, grounds, vacant buildings in Navi Mumbai became a haven for gangsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.