भूमाफियांचे आव्हान
By admin | Published: July 6, 2015 05:57 AM2015-07-06T05:57:28+5:302015-07-06T05:57:28+5:30
सिडकोच्या आवाहनाला केराची टोपली दाखवित भूमाफियांनी आता थेट सिडकोलाच आव्हान दिले आहे. संभाव्य कारवाईची कोणतीही पर्वा न करता अतिक्रमणांचा धडाका सुरूच आहे.
नवी मुंबई : सिडकोच्या आवाहनाला केराची टोपली दाखवित भूमाफियांनी आता थेट सिडकोलाच आव्हान दिले आहे. संभाव्य कारवाईची कोणतीही पर्वा न करता अतिक्रमणांचा धडाका सुरूच आहे. अर्धवट बांधकामे पूर्ण करण्यावर जोर दिला जात आहे. त्याचप्रमाणे नवीन बांधकामांनीही वेग घेतला आहे. त्यामुळे २0 जुलैनंतर अशा बांधकामांच्या विरोधात पुन्हा धडक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या सूत्राने दिली.
प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांविषयी सकारात्मक भूमिका घेत सिडकोने गावठाणाची दोनशे मीटरची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जानेवारी २0१३ नंतर उभारलेल्या ४२५ अनधिकृत बांधकामांना आता नव्याने नोटिसा बजावण्यात येणार आहेत. नोटीस मिळाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी डिसेंबर २0१२ पूर्वीचे बांधकाम असल्याचे पुरावे सिडकोला सादर करायचे आहेत. असे पुरावे सादर न करणारी बांधकामे अनधिकृत घोषित करून त्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करून नवीन बांधकामे उभी राहणार नाहीत, यादृष्टीने प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी केले आहे. मात्र या आवाहनाला न जुमानता भूमाफियांनी बांधकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे. अर्धवट अवस्थेतील बांधकामे पूर्ण करण्याचा सपाटा सुरू आहे, तर काही ठिकाणी जमीनदोस्त केलेली बांधकामे पुन्हा मूळ धरू लागली आहे. कोपरी येथे पामबीच मार्गाला लागून असलेल्या मोकळ्या जागेवरील अनधिकृत बांधकाम काही महिन्यांपूर्वी सिडकोने जमीनदोस्त केले होते. मात्र मागील काही दिवसांपासून ते पुन्हा उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे कारवाईनंतर त्या जागेवर कोणतेही बांधकाम उभारले जावू नये, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानंतरही गॅरेज व्यवसायाच्या आडून ताडपत्रीचा आडोसा घेऊन पक्के बांधकाम केले जात आहे.
वाशी विभाग कार्यालयाने ५ जून २0१५ रोजी यासंदर्भातील अहवाल सिडकोच्या अतिक्रमण विभागाला सादर करून कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर संबंधित बांधकामधारकांनाही नोटीस बजावून बांधकाम थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही हे बांधकाम सुरूच असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला आहे. सिडको आणि महापालिका विभाग कार्यालयाला वाकुल्या दाखवित कोपरखैरणे सेक्टर ६ येथे एक बहुमजली बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीत रहिवासी राहत असल्याचा दिखावा निर्माण करून उर्वरित कामे पूर्ण केली जात आहेत. सानपाडा गावात सर्वाधिक नवीन बांधकामे सुरू आहेत. येथील सेक्टर ५ मध्ये अलीकडेच एका नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. रविवारी या इमारतीचा पहिला स्लॅब टाकण्यात आला. यावरून सिडकोच्या कारवाईला भीक न घालता भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरूच ठेवल्याने अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्त नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
च्प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी केलेल्या आग्रही मागणीनंतर सिडकोने गावठाणाची दोनशे मीटरची अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच जानेवारी २०१३ नंतरच्या बांधकामांवर कारवाई करण्याअगोदर प्रत्येक बांधकामधारकाला आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी देण्याचेही सिडकोने मान्य केले आहे.
च्त्याबदल्यात यापुढे विनापरवाना नवीन बांधकामे होणार नाहीत, त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र त्यानंतरही ठिकठिकाणी नवीन बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.