अलिबाग : सन २००३ पूर्वी वीज मंडळ असताना स्पर्धा नव्हती. मात्र त्यानंतर महावितरण व महानिर्मितीपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सुरू झालेल्या स्पर्धेची झळ आता हळूहळू कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचू लागली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वीज ग्राहक टिकविणे हेच महावितरणपुढील मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे १८ वे द्विवार्षिक महाअधिवेशन नुकतेच अलिबाग तालुक्यातील तीनवीरा धरणाजवळील द्रोणागिरी मैदानावर आयोजित करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन संजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार म्हणाले की, महानिर्मितीची वीज घेत असताना आपण एम्प्लॉयी कॉस्टसह खर्च गृहीत धरतो त्यानुसार आकारणी करतो. आज जिथे स्वस्त वीज मिळेल तेथून वीज घ्यावी लागते. महानिर्मितीची वीज महाग असेल तर ती का घ्यावी? असा प्रश्न ग्राहक विचारु शकतात. पूर्वी तिन्ही कंपन्यांची एकाधिकारशाही होती आज ती नाही. नियामक आयोग ग्राहकासाठी काम करतो, त्यामुळे महापारेषणच्या खर्चाबाबत विचारू शकतो. खर्चाला लगाम घालू शकातो, असा इशारा त्यांनी दिला.खुल्या ग्राहक धोरणामुळे एक मेगावॅटच्या पुढील वीज वापर करणारे अनेक ग्राहक महावितरण सोडून गेले आहेत. औद्योगिक ग्राहकावर आणखी जादा बोजा आपण टाकू नाही शकणार. औद्योगिक ग्राहक ही दूध देणारी गाय आहे. ग्राहकांचा विजय झाला, वीज क्षेत्राचा विजय झाला तरच तुमचा माझा विजय होणार आहे. ग्राहकाचा आणि वीज क्षेत्राचा विजय नाही तर आपला विजय होणार नाही. अपेक्षित महसूल येत नाही, त्यावरून दोन वर्षानंतर पगार देणे अवघड होणार आहे. याला तुम्ही आम्ही सर्वजण जबाबदार आहोत. ५ ते १५ टक्के तोटा कमी केला तरी दोन अडीच हजार कोटीने महसूल वाढ होणार असल्याचे संजीव कुमार यांनी सांगितले.दुसऱ्या सत्रात नवीन केंद्रीय कार्यकारिणी स्थानापन्न झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विष्णूस्वरूप पाटील, महापारेषण व महानिर्मितीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनंत पाटील, मुख्य अभियंता अनिल मुसळे ,अधीक्षक अभियंता ए.बी.शेख, संघटनेचे सरचिटणीस आर. टी. देवकांत, उपसरचिटणीस रवी बारई आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्राहक टिकविणे हेच महावितरणपुढील आव्हान
By admin | Published: February 09, 2017 4:46 AM