वाहनचोरी थांबविण्याचे पोलिसांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:06 AM2019-04-20T00:06:58+5:302019-04-20T00:07:00+5:30
पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये वाहनचोरीचे प्रमाण वाढू लागले आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये वाहनचोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रतिदिन किमान दोन वाहने पळविली जात आहेत. पाच वर्षांमध्ये तब्बल ३३५३ वाहने चोरीला गेली असून, त्यापैकी फक्त १००१ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये चोरी, घरफोडीचे गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. यामध्ये वाहनचोरीचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. शहरामधील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही, यामुळे नागरिकांना रात्री जागा मिळेल तेथे वाहने उभी करावी लागत आहेत.
अवजड वाहनांसाठी ट्रक व बस टर्मिनलची संख्या अपुरी आहे. यामुळे मोकळ्या भूखंडावर व रोडच्या बाजूला वाहने उभी करावी लागतात. पार्किंगची ही समस्या चोरट्यांच्या पथ्यावर पडली आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये वाहनचोरी करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. दिवसा रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणावरून वाहने पळविली जात आहेत. रात्री रहदारी नसलेल्या रोडवर उभी केलेली वाहने पळविली जात आहेत. पाच वर्षांमध्ये तब्बल ३३५३ वाहने चोरीला गेली आहेत. पूर्वी दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक होते; परंतु आता कार व अवजड वाहनेही पळविली जात आहेत. पाच वर्षांमध्ये २८५ ट्रक, टेम्पो व इतर वाहने चोरीला गेली आहेत. ८१७ कार व तब्बल २२५१ दुचाकी पळविल्या आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. २०१४ पासून फक्त १००१ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, अद्याप २३५२ वाहनांचा शोध घेण्यात अपयश आले आहे.
घरफोडी व इतर गुन्ह्यांच्या तुलनेमध्ये वाहनचोरी करणे अत्यंत सोपे आहे. रोडवर व पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचे लॉक दोन मिनिटांमध्ये तोडून चोरटे वाहन घेऊन पळ काढतात. चोरी झाल्याचे निदर्शनास येईपर्यंत आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर पोहोचण्यात यश येत आहे. मुंबईच्या बाहेर गाडी गेली की, ती पुन्हा सापडण्याची शक्यता कमीच असते. यामुळे वाहनचोरी करणाºया टोळ्या वाढत आहेत. पोलिसांनी वाहनचोरी थांबविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत; परंतु त्यांना वाहनधारकांचे सहकार्य लाभत नाही. वाहनांमध्ये टेप व इतर उपकरणे बसविण्यावर हजारो रुपये खर्च करणारे नागरिक सुरक्षा उपकरण खरेदी करण्याचे टाळत आहेत. लाखो रुपयांची गाडी घेऊन त्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी वाहनधारकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
>सुरक्षा उपकरण बंधनकारक
वाहनचोरीच्या घटना थांबविण्याची जबाबदारी फक्त पोलिसांची नाही. वाहनधारकांनी स्वत:ही यासाठी लक्ष दिले पाहिजे. वाहनांसाठी सुरक्षा उपकरण बसवून घेणे आवश्यक आहे. दुचाकीला १०० ते २०० रुपयांमध्ये सुरक्षा उपकरण मिळत आहे. पेट्रोल लॉकची व्यवस्था करता येते. कार व अवजड वाहनांसाठीही काही पाच हजार रुपयांपेक्षा कमी खर्चामध्ये चांगली उपकरणे मिळत आहेत; परंतु वाहनधारक ही उपकरणे खरेदी करण्यासाठी उदासीनता दाखवत असल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे.
>चोरीच्या वाहनांचे होते काय?
वाहनचोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चोरी झालेल्या वाहनांचे नक्की काय केले जाते, याचे गूढ अद्याप पोलीस यंत्रणेलाही पूर्णपणे उलगडलेले नाही. काही वाहने चोरून दुसºया गुन्ह्यांसाठी वापरली जातात. यापूर्वी २००८ मध्ये गुजरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्येही नवी मुंबईमधून चोरी केलेल्या कारचा वापर केल्याचे तेव्हा तपासामध्ये समोर आले होते. चोरी केलेली काही वाहने परराज्यात दुर्गम भागात कमी किमतीमध्ये विकली जात असून, बहुतांश वाहनांचे पार्ट काढून त्यांची विक्री केली जात असल्याचे बोलले जात आहे.