कळंबोली : सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यातून सामाजिक भावना भडकत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही माध्यमे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी कळंबोली येथे व्यक्त केले. गुरुवारी सायंकाळी ३०व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता झाली. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कोरेगाव-भीमा घटनेचा दाखला देत महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हातळली. महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक होत आहे. याचे श्रेय पोलिसांनाही जाते. महाराष्ट्रातील लोकसंख्या ११ कोटींपेक्षा जास्त आहे. तुलनेत मनुष्यबळ अपुरे असले तीर पोलीस चांगले काम करीत असल्याचे राव यांनी सांगितले. हे युग तंत्रज्ञानाचे असल्याने स्मार्ट पोलिसांची गरज निर्माण झाली आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद संपविण्याकरिता महाराष्ट्र पोलीस प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यपालांची मराठीतून सुरुवातराज्यपाल विद्यासागर राव यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. नवीन वर्ष, तसेच मकरसक्र ांतीच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी विजेते संघ आणि स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेत पुरुषांच्या गटात राज्य राखीव पोलीस दलाने १४७ गुण तर महिलांमध्ये मुंबई पोलिसांनी ११८ गुण मिळून प्रथम क्र मांक पटकावला. मुंबई शहर पोलीस (पुरुष), कोल्हापूर परिक्षेत्र (महिला) द्वितीय क्र मांक मिळवला. तिसरा क्र मांक पुरुष गटात कोल्हापूर परिक्षेत्र आणि महिला गटात नवी मुंबई व कोकण परिक्षेत्राने पटकावला.नवी मुंबई व कोकण परिक्षेत्रातील राहुल काळे यांनी मैदान खेळात पुरुष गटात सर्वाधिक गुण मिळवत मोटारसायकल जिंकली. तर कोल्हापूर परिक्षेत्रातील जयश्री बोगरे हिने अव्वल गुणाची कमाई करीत स्कुटीची मानकरी ठरली.
पोलिसांसमोर सोशल मीडियाचे मोठे आव्हान - विद्यासागर राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:52 AM