एपीएमसीतील गुटखा विक्री रॅकेट थांबविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:51 PM2019-05-28T23:51:03+5:302019-05-28T23:51:06+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुटखा पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आव्हान पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

 Challenge to stop the Gutkha sales racket in APMC | एपीएमसीतील गुटखा विक्री रॅकेट थांबविण्याचे आव्हान

एपीएमसीतील गुटखा विक्री रॅकेट थांबविण्याचे आव्हान

Next

- नामदेव मोरे 
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुटखा पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आव्हान पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनासमोर उभे राहिले आहे. तक्रारी करूनही माफियांवर कडक कारवाई होत नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांना अभय मिळत असल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
एपीएमसीच्या भाजी मार्केटजवळील बंद इमारतीमध्ये ९ मे रोजी गुटख्याचा अवैध साठा पोलिसांना आढळून आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास केला असता संशयित आरोपीचा रिक्षा व घरामध्येही मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला होता. जप्त केलेला माल कारवाई न करता सोडण्यासाठी पोलिसांनी संबंधिताकडे ६० हजार रुपये लाच मागितली होती. या घटनेविषयी संबंधिताने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी २७ मार्चला सापळा रचून एपीएमसी पोलीस ठाण्यातीलकर्मचारी रामेश्वर खताळ व साईछत्र टी अँड पान शॉपमधील कर्मचारी भुरा गमीरा पाटीदार याला ३० हजार रुपये लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेमुळे एपीएमसी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. अवैध गुटखा विक्रीच्या व्यवसायाला पोलिसांकडूनच अप्रत्यक्षपणे अभय मिळत असल्याची चर्चा केली जात आहे. शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही बाजार समितीच्या पाचही मार्केटमधील पानटपºयांमध्ये उघडपणे गुटखा विक्री केली जाते. याविषयी कामगारांसह अनेकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर सुरक्षारक्षकांनीही कारवाई करून गुटखा जप्त केला आहे. सुरक्षा विभागाने याविषयीचा अहवाल पोलिसांनाही दिला आहे. पण संंबंधितांवर कडक कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
एपीएमसी परिसरामध्ये तक्रारी वाढल्या की गुटखा विक्री करणाºयांविरोधात किरकोळ कारवाई केली जाते. पण पूर्णपणे गुटखा विक्री थांबविली जात नाही. सरसकट सर्वांवर कारवाईही केली जात नाही. या परिसरामध्ये एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्ती पानटपºयांना गुटखा पुरविण्याचे काम करत आहेत. त्यांनी अनेक पानटपºया विकत व भाडेकरारावर चालविण्यासाठी घेतल्या आहेत.
२० पेक्षा जास्त टपºया संबंधितांकडे असल्याची चर्चा आहे. गुटखा पुरविण्याचे काम कोण करतो याची बाजार समितीमधील सर्वांनाच माहिती असतानाही संबंधितांवर पोलीस, अन्न व औषध प्रशासनासह बाजार समितीने कधीच कडक कारवाई केलेली नाही. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी या परिसराकडे फारसे लक्ष देत नाहीत.
पोलीस त्यांची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर झटकत असून एपीएमसी प्रशासनानेही गांभीर्याने या समस्येकडे लक्ष दिले नाही. यामुळे ठरावीक व्यक्तींनी गुटखा विक्रीचे साम्राज्य निर्माण केले असून लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर तरी पोलीस कडक भूमिका घेऊन सर्व अवैध व्यवसाय थांबविणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
>मोकळ्या इमारतीमध्ये गोदाम
भाजी मार्केट व विस्तारित भाजी मार्केटच्या मध्ये सिडकोने बालवाडीसाठी इमारत बांधली होती. मोडकळीस आलेली ही वास्तू बाजार समितीकडे हस्तांतर करण्यात आली आहे. पण त्याचा वापर धर्मशाळेप्रमाणे होऊ लागला आहे. गुटखा विक्री करणाºयांसह पानटपरीमधील इतर साहित्य ठेवण्यासाठी गोदामाप्रमाणे त्या इमारतीचा वापर केला जात आहे.याच इमारतीमध्ये गुटख्याचा साठाही सापडला होता. सद्यस्थितीमध्ये याठिकाणी अनधिकृतपणे खानावळ सुरू करण्यात आली आहे.
>‘लोकमत’ने उठविला होता आवाज
बाजार समितीमध्ये गुटखा विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याचे ‘लोकमत’च्या टीमने स्टिंग आॅपरेशन करून निदर्शनास आणून दिले होते. भाजी, फळ व इतर मार्केटमधील पानटपºयांमध्ये सुरू असलेल्या गुटखा विक्रीची छायाचित्रेही प्रसिद्ध केली होती. याची दखल घेऊन सुरक्षारक्षकांनी कारवाई करून गुटखा जप्तही केला होता. पोलिसांनाही याचा अहवाल दिला होता, परंतु पोलिसांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. अवैध व्यवसाय करणाºयांना अभय मिळू लागले होते.
>मार्चपासून तीन
वेळा कारवाई
एपीएमसी परिसरामध्ये मार्चपासून तीन वेळा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. १३ मार्चला भाजी मार्केटमधील पानटपरीवर धाड टाकून २३ हजार ७७५ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. सुधीरकुमार पाठक, राहुल चौहान, जितू दास व कालू उर्फ प्रमोद दासविरोधात गुन्हा दाखल केला होता. २३ एप्रिलला भाजी मार्केटमध्येच कारवाई करून सुभाष श्रीवास्तव या टपरी चालकावर कारवाई केली होती. ९ मे रोजी भाजी मार्केटच्या बाहेरील मोकळ्या इमारतीमध्ये धाड टाकून गुटख्याचा साठा जप्त केला होता. येथीलच एका कारवाईमधील जप्त केलेला माल सोडून देण्यासाठी लाच घेताना पोलीस कर्मचाºयाला अटक केली आहे.

Web Title:  Challenge to stop the Gutkha sales racket in APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.