एमआयडीसीपुढे उद्योग टिकविण्याचे आव्हान; निम्याहून अधिक कामगारांनी गाठले गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 12:34 AM2020-05-28T00:34:54+5:302020-05-28T00:35:01+5:30
मुंबईसह नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : लॉकडाउनमुळे नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रदेखील धोक्यात आले आहे. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये काम करणारे निम्म्याहून अधिक कामगार गावाकडे पळाले आहेत. त्यामुळे लॉकडाउननंतर उद्योग सुरू झाल्यास औद्योगिक क्षेत्राला पुन्हा उभारी मिळणे कठीण झाले आहे.
मुंबईसह नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यानंतरदेखील लॉकडाउन हटविला जाण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी, मागील दोन महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या चाकरमान्यांनीही गावाकडे धाव घेतली आहे. त्यामध्ये नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचाही समावेश आहे.
राज्याच्या विविध भागांतील तसेच परराज्यांतील हे कामगार आहेत. त्यांनी गाव गाठल्याचा धसका औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी घेतला आहे. वर्षानुवर्षे काम करणारे कामगार निघून गेल्याने, लॉकडाउननंतर पुन्हा उद्योग सुरू झाल्यास प्रशिक्षित कामगारांची कमतरता भासणार आहे. त्याचा परिणाम उत्पादन निर्मितीवर पुढील वर्षभर होऊ शकतो. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच कामगारांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेऊन उद्योग सुरू ठेवण्याची मागणी उद्योजकांच्या संघटनेने शासनाकडे केली होती; परंतु शासनाकडून केवळ अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती.
लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उद्योग वगळता सर्व उद्योग बंद आहेत. त्या ठिकाणचे कामगार गावी निघून गेल्यामुळे उद्योजकांना पुन्हा उद्योग सुरू करताना अडचण भासणार आहे. याचा मोठा फटका संबंधित व्यवसायासह शासनालादेखील बसणार आहे.
- मंगेश ब्रह्मे, व्यवस्थापक, ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज् असोसिएशन
उद्योग टिकविण्यासाठी कामगार टिकविणे गरजेचे होते. त्यानुसार कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती. परंतु सतत पाठपुरावा करूनदेखील ठोस निर्णय झाला नाही. परिणामी, उद्योग बंद असल्याने बेरोजगार झालेले कामगार गावाकडे गेले असून भविष्यात त्याचा फटका संपूर्ण उद्योग क्षेत्राला बसणार आहे.
- के. आर. गोपी, अध्यक्ष, लघू उद्योजक संघटना
नवी मुंबईच्या एमआयडीसी क्षेत्रात सुमारे ४५०० मोठे उद्योग तर २००० च्या जवळपास छोटे उद्योग आहेत. त्यापैकी सुमारे २००० मोठे तर ३०० छोटे उद्योग सद्य:स्थितीला सुरू आहेत. उर्वरित उद्योग बंद असल्याने त्यांच्याशी संलग्न महावितरण, इंधन, वाहतूकदार यांनाही तोटा सहन करावा लागत आहे.
आशिया खंडातील सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र नवी मुंबईत आहे. दिघा येथून ते नेरुळपर्यंत हे क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे एमआयडीसी क्षेत्र व रहिवासी क्षेत्र अशा दोन भागांत नवी मुंबई विभागली आहे. या औद्योगिक क्षेत्रात छोटेमोठे असे सुमारे सहा हजार उद्योग आहेत. त्यानिमित्ताने सुमारे साडेतीन लाखांहून अधिक कामगार तिथे नोकरी करीत आहेत. मात्र मागील पाच वर्षांत काही मोठे उद्योग वेगवेगळ्या कारणांनी राज्याबाहेर हलविले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला घरघर लागलेली असतानाच कोरोनामुळे नवे संकट कोसळले आहे. या संकटातून तिथले सर्वच उद्योग पुन्हा उभे राहू शकतील का? याबाबतही शंका आहे.