बँक दरोड्याचे मालेगाव कनेक्शन, सोनारांना विकलेला ऐवज जप्त करण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:12 AM2017-11-20T06:12:33+5:302017-11-20T06:13:33+5:30
नवी मुंबई : बडोदा बँक लुटीच्या प्रकरणात मालेगाव कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे.
नवी मुंबई : बडोदा बँक लुटीच्या प्रकरणात मालेगाव कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. ३० लॉकरमधून लुटलेला सोन्याचा ऐवज त्यांनी मालेगावमधील सोनारांंना विकल्याचे समजते. मात्र, तीन दिवसांपासून पोलिसांचे पथक त्या ठिकाणी तळ ठोकून असतानाही काहीच हाती लागलेले नाही. त्यामुळे बँक लुटीमध्ये चोरीला गेलेला ऐवज जप्तीसाठी पोलिसांची कसोटी लागली आहे.
जुईनगर येथील बडोदा बँक लुटीच्या घटनेला आठवडा झाला आहे. या कालावधीत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मोमीन अमित खान (२४), श्रावण कुमार हेगडे (३७), हाजीद अली सफदर अली मिर्जा बेग (४५) व अंजन आनंद महांती (४३) अशी त्यांची नावे आहेत. हाजीद व श्रावण गोवंडीचे राहणारे असून दोघेही रिक्षाचालक आहेत. घटनास्थळी हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे मुंबईतून त्यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांनी गेणा प्रसाद याला बँक लुटण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने सहकार्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, गेणाविषयीची अधिक कसलीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. यामुळे गेणा याच्यासह त्याच्या इतर साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीने एकत्रित आलेल्या या टोळीने इतरही गुन्हे केल्याची शक्यता आहे. २०१४मध्ये हरयाणा येथे अशा प्रकारे भुयार खोदून बँक लुटण्यात आली होती. त्या गुन्ह्याशीही या टोळीचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बडोदा बँक लुटीच्या प्रकरणात महत्त्वाचे धागे पोलिसांच्या हाती लागले असले, तरीही चोरीला गेलेला ऐवज अद्याप हाती लागलेला नाही. गेणा व त्याच्या सहकाºयांनी लुटलेला ऐवज मालेगाव येथील सोनारांना विकल्याचे समजते. यापूर्वीच्याही गुन्ह्यांतील चोरीचा ऐवज ते त्याच ठिकाणी विकायचे, असेही समजते; परंतु तीनहून अधिक दिवस पोलिसांनी परिसराची झडती घेऊनही काहीच हाती लागलेले नसल्याचेही समजते. बँक लुटणारी टोळी व त्या ठिकाणचे सोनार सराईत असल्याने पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पकडल्यानंतरही लुटीचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे.