पनवेल : सध्याच्या स्पर्धात्मक युगात शालेय विद्यार्थ्यांची जडण-घडण, त्यांचे करिअर, वाढत्या वयाची समस्या हे पालकांपुढे मोठे आव्हान ठरत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, इतर शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा-सांस्कृतिक विषयांतील ज्ञानही आवश्यक झाले आहे. मात्र या सर्वांमुळे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव वाढत असून त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होते. यावर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकमत आणि नगरपरिषदेच्या वतीने ‘मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान’ या विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवार, ३० जुलै २०१५ रोजी सकाळी १० वा. हा कार्यक्रम होणार असून यावेळी चंद्रकांत पागे मार्गदर्शन करणार आहेत. मुलांमध्ये बेजबाबदार वर्तन, अचानक होणारे भावनिक असंतुलन, त्यांच्या वयाला न शोभणारी कृती आणि त्यातून उमटणारे पडसाद, आत्महत्यांचे वाढते प्रमाण, सहनशीलतेचा अभाव, स्वभावातील हट्टीपणा, चिडचिडेपणा येतो कुठून याचा शोध पालक तसेच शिक्षकांनी घेतला पाहिजे आणि त्यातून मुलांना समजावता, सावरताही आले पाहिजे. वरकरणी साध्याच वाटणाऱ्या मुलांमधील या समस्या जाणून त्या मनोरंजनातून, प्रबोधनातून सोडविण्याबरोबरच पालकत्वाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांबरोबरच आजी-आजोबा, शिक्षक, प्राध्यापकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
‘मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान’
By admin | Published: July 28, 2015 10:39 PM