शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान, गावी गेलेले मतदार आलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:20 AM2019-04-29T01:20:43+5:302019-04-29T01:21:06+5:30
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लग्न व सुट्ट्यांसाठी गावी गेलेले मतदार परत आले नाहीत. वाढत्या तापमानाचा फटका बसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लग्न व सुट्ट्यांसाठी गावी गेलेले मतदार परत आले नाहीत. वाढत्या तापमानाचा फटका बसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे मतदारसंघामधील ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्र नवी मुंबईमध्ये येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ८ लाख २४ हजार ७०२ मतदार आहेत. यामधील ऐरोलीमध्ये ४ लाख ४८ हजार व बेलापूरमध्ये ३ लाख ७६ हजार मतदार आहेत. वास्तविक निवडणुकीमध्ये दोन्ही प्रमुख उमेदवार ठाण्यामधील आहेत. यामुळे नवी मुंबईकरांमध्ये प्रचारादरम्यान फारसा उत्साह दिसला नाही. माथाडी कामगारांसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणामधील नागरिक सुट्टींमुळे व मूळ जिल्ह्यातील निवडणुकांमुळे गावी गेले आहेत. २९ एप्रिलला मतदानासाठी सुट्टी असल्यामुळे व १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने अनेकांनी गावी राहणेच पसंत गेले आहे. याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संपर्कामधील मतदारांशी फोनवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मतदानासाठी येण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो हे उद्या स्पष्ट होणार आहे. शहरामधील तापमानही ४० अंशावर गेले आहे. याचा परिणामही मतदानावर होण्याची शक्यता आहे. मतदान वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.
नवी मुंबईच्या तुलनेमध्ये मावळ मतदारसंघामधील पनवेल व उरणमध्ये मतदान वाढण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासून या परिसरामध्ये प्रचाराला सुरुवात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू व अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. युती व आघाडीच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढले होते. प्रत्येक गावामध्ये व महापालिका कार्यक्षेत्रामधील प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
कार्यकर्ते फोन करण्यात व्यस्त
रविवारी शिवसेना, भाजप, काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी दिवसभर फोन करून मतदानासाठी येण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली होती. गावी गेलेल्या मतदारांनाही मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. शहरात उपस्थित असणाऱ्यांनाही मतदान करा व नंतर सुट्टीचा आनंद घ्या, असे आवाहनही केले जात होते.
फोन घरी ठेवण्याचे आवाहन
मतदान केंद्रावर फोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे, यामुळे मतदारांनी फोन घेऊन मतदानासाठी जाऊ नये, असे आवाहनही सोशल मीडियावरून दिवसभर केले जात होते. मतदारांची गैरसोय, केंद्रावर फोनमुळे वाद होऊ नयेत, यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले आहे.
निकृष्ट नाष्टा असल्याने नाराजी
वाशीमधील सेक्रेड हार्ट शाळेमध्ये रविवारी सकाळी बुथनिहाय मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी अधिकारी व कर्मचारी सकाळपासून येथे उपस्थित होते. निवडणूक विभागाने याठिकाणी बसण्यासाठी व इतर सर्व सुविधा केली होती. कर्मचाºयांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था केली होती. पण पोहे खूप अगोदर बनवून ठेवले असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.