गणेश नाईकांच्या जनता दरबारात चंपासिंह थापांची हजेरी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 20:07 IST2025-02-03T20:04:40+5:302025-02-03T20:07:39+5:30
वाशीमध्ये झालेल्या मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात चंपासिंह थापा यांनी हजेरी लावली होती.

गणेश नाईकांच्या जनता दरबारात चंपासिंह थापांची हजेरी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश
Ganesh Naik Janta Darbar: वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारावरुन भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेतला होता. यावरुन भाजप आणि शिंदे गटामध्ये चांगलीच जुंपली होती. त्यानंतर आता नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावली सारख्या असणाऱ्या चंपासिंह थापा यांनी गणेश नाईक यांच्या जनता दरबारात हजेरी लावली होती.
मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जनता दरबार भरवल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. ठाण्यातील लोकांनी त्यांच्या समस्या घेऊन थेट गणेश नाईक यांचा जनता दरबार गाठला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातही गणेश नाईक हे जनता दरबार भरवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मी ठाण्यात जनता दरबार आयोजित करण्यावर ठाम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या अन्य मंत्र्यांनी जनता दरबार आयोजित केला तर मला हरकत नाही. उलट लोकांच्या समस्या सोडवण्यास गती मिळेल, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली होती.
त्यानंतर आता नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या जनता दरबाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे जनता दरबार भरवला होता. मात्र या जनता दरबारात बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू चंपासिंह थापा यांनी गणेश नाईक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गणेश नाईक यांना निवेदन देखील दिलं. त्यामुळे आता थापा यांच्या भेटीची चर्चा सुरु झाली आहे.
चंपासिंह थापा हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे आणि त्यांचे सहाय्यक होते. एकनाथ शिंदे यांनी चंपासिंह थापा यांना शिंदे गटात सामिल करुन घेतलं होतं. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असणारे थापा २०१२ मध्ये त्यांच्या निधनानंतर मातोश्रीपासून दूर जाऊ लागले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गटात सामील झाले. थापा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. त्यानंतर आता थापा हे थेट गणेश नाईक यांच्या जनता दरबारात पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.