सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर अपघाताची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 11:32 PM2020-09-28T23:32:35+5:302020-09-28T23:33:03+5:30
नामफलक बनला धोकादायक : दुरुस्तीकडे सिडकोचे दुर्लक्ष
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खासगी शिक्षण संस्थेचा नामफलक धोकादायक झाला आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळून पादचारी जखमी होण्याची शक्यता असूनही, संस्थाचालक व सिडको प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. नवी मुंबईमधील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनमध्ये सानपाडाचाही समावेश आहे. स्टेशन परिसरातून हजारो नागरीक ये-जा करत असतात. रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये अनेक खासगी संस्थांची कार्यालये आहेत. काही संस्थांनी इमारतीवर मोठे नामफलक लावले आहेत. यामधील इन्स्टिट्यूट आॅफ अपेरल मॅनेजमेंट संस्थेच्या नामफलकाचा काही भाग अर्धवट तुटून खाली लोंबकळत आहे.
दुसºया मजल्यावरून हा भाग कोसळला, तर खालून ये-जा करणाºया पादचाऱ्यांच्या डोक्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सिडको प्रशासनाची आहे. यामुळे प्रशासनाने संबंधित संस्थेला सांगून किंवा स्वत: धोकादायक फलक हटविणे आवश्यक आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात इमारतीच्या देखभाल दुरुस्तीविषयी तक्रार करण्यासाठी सिडकोचा हेल्पलाइन नंबरही नाही. यामुळे याविषयी तक्रार नक्की कुठे करायची, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.