नवी मुंबई: महाविजय अभियान २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंगळवारी नवी मुंबईमध्ये संघटनात्मक दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रदेशाध्यक्षांचे नवी मुंबई नगरीत जोरदार स्वागत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले असल्याची माहिती नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघात मंगळवारी त्यांचा दौरा होणार आहे. त्यांच्या या दौर्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाची माहिती, ध्येयधोरणे, बुथमधील शेवटच्या नागरिकापर्यंत माहिती व्हावी, याकरिता विधानसभा मतदार संघातील तीन ते चार बुथची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आलेल्या विधानसभा वॉरियर्सची बावनकुळे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बैठक घेणार आहेत.
या बैठकीनंतर वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करतील. वाशी सेक्टर १७ येथील महात्मा फुले भवन चौक येथून महाविजय रॅली प्रारंभ होणार आहे. विविध भागात फिरल्यानंतर सेक्टर १७ येथील अभ्युदय बँकेजवळ रॅलीची सांगता होणार आहे. याप्रसंगी बावनकुळे चौकसभेतून मार्गदर्शन करणार आहेत.
रॅली दरम्यान ’घर घर चलो संपर्क’ अभियान व ’मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रदेशाध्यक्षांसोबत ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभेतील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.