लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एकाच नंबरप्लेटचे दोन ट्रेलवर रस्त्यावर धावत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सापळा रचला असता एकाच नंबरचे दोन ट्रेलर आढळून आले. अधिक चौकशीत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने ट्रेलरवर बँकेचे कर्ज असून त्याचे हप्ते थकल्याने संभाव्य जप्ती टाळण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली दिली.
तुर्भे एमआयडीसी मधील एस. एस. लॉजिस्टिक व शिवम ट्रान्सपोर्ट यांच्या माल वाहतुकीसाठी एकाच नंबरचे दोन ट्रेलर वापरले जात असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे सहायक निरीक्षक प्रभाकर शिऊरकर यांनी बुधवारी पहाटे तुर्भे नाका येथे पथकासह सापळा रचला होता. यावेळी दोन ट्रेलर एकच क्रमांकाची नंबरप्लेट वापरलेले दोन ट्रेलर आढळून आले. त्यामुळे दोन्ही ट्रेलर जप्त करून कागदपत्रांची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये बँकेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले. त्यानुसार गुरुवारी रात्री ट्रेलर चालक हरिचंद्र यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु दोन वाहनांना एकच नंबरप्लेट वापरण्याचा हा प्रकार ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शिवम सिंग यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांनी केल्याची कबुली दिली आहे. एका ट्रेलरवर बँकेचे कर्ज असून ते थकलेले आहे. यामुळे बँकेकडून येणारी जप्ती टाळण्यासाठी बँकेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केला असून त्याची कल्पना सर्वांना होती. परंतु ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने केलेल्या कृत्यात केवळ चालकावर गुन्हा दाखल झाल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर या प्रकरणात आरटीओ कडून कोणत्या प्रकारची कारवाई केली जाणार आहे कि नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बँकेची दिशाभूल करण्यासाठी केलेल्या कृत्यात त्या ट्रेलर कडून अपघात झाला असता तर तपासात पोलिसांना देखील अडचण निर्माण झाली असती. त्यामुळे याप्रकरणी संबंधित सर्वांवर कारवाईची मागणी होत आहे.