पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता हस्तांतर करात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता सरसकट कर आकारणीपद्धत लागू करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीने या संबंधीच्या प्रस्तावाला अलीकडेच मंजुरी दिली आहे. नव्या कर आकारणी प्रणालीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असली तरी त्याचा सर्वसामान्य रहिवाशांनाही फायदा होणार असल्याचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर प्रशासकीय काळामध्ये मालमत्ता हस्तांतरावर बाजारमूल्यापेक्षा ०.२ टक्के इतका कर लागू करण्यात आला आहे. हा कर आकारताना क्षेत्रफळानुसार अथवा हस्तांतर प्रकरणानुसार कोणतीही वर्गवारी केली नव्हती.मृत्युपत्राद्वारे, बक्षीसपत्र व वारसा हक्काने होणाऱ्या हस्तांतरालाही जास्त शुल्क द्यावे लागत होते. त्यामुळे पनवेल शहरातील ४०० हून अधिक खटले प्रलंबित आहेत. पालिका क्षेत्राचा विचार केला तर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा कर कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मालमत्ता हस्तांतर कर पद्धतीत बदल करण्याच्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.या करात बदल केल्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच शहरातील ४०० हून अधिक खटले वेगाने निकाली लागण्यास मदत होईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.महापालिकेच्या प्रशासकीय काळात लागू केलेला कर अधिक होता, त्यावर सामान्य जनता नाराज होती. त्यामुळे सुधारित मालमत्ता कर प्रस्तावित करून संबंधित ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शहरातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील व पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल.- परेश ठाकूर, सभागृह नेते,पनवेल महानगरपालिका
पनवेलमधील मालमत्ता हस्तांतर करात बदल, महापालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 2:21 AM