वेळापत्रकात बदल केल्याने पालक, विद्यार्थ्यांचे आंदोलन
By admin | Published: April 18, 2017 06:48 AM2017-04-18T06:48:39+5:302017-04-18T06:48:39+5:30
ऐरोली सेक्टर ३ मधील श्रीराम विद्यालयाने कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेच्या वेळापत्रकात बदल केल्याने संतप्त झालेल्या पालक व विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले
नवी मुंंबई : ऐरोली सेक्टर ३ मधील श्रीराम विद्यालयाने कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेच्या वेळापत्रकात बदल केल्याने संतप्त झालेल्या पालक व विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले. पुढील दोन दिवसांत यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालक व विद्यार्थ्यांनी दिला आहे.
श्रीराम विद्यालयाने दोन वर्षांपूर्वी अतिरिक्त फीवाढ केली होती. या वेळी पालक संघटनेने दणका दिल्यांनतर शाळेने फीवाढ मागे घेतली होती. पण पुन्हा एकदा शाळेने सकाळच्या सत्रामध्ये भरणारी शाळा दुपारच्या सत्रात सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी आंदोलन केले. शाळेत या वर्षीपासून इयत्ता १0 वीचे जादा वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी सकाळी दहावीचे विद्यार्थी व शिक्षक शाळेच्या आवारात आले. पण शाळा व्यवस्थापनाने त्यांना आवारात प्रवेश दिला नाही. त्यामुळे सुमारे दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी विनवणी केल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला. याप्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी व शिक्षकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन करीत निषेध केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिदार यांनी घटनास्थळी येवून पालक व शाळा व्यवस्थापनांत चर्चा घडवून आणली. त्यामुळे पुढील दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय घेवून पालकांना कळविण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिल्यानंतर पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले.