शाळांच्या वेळेमध्ये होणार बदल!
By Admin | Published: May 10, 2016 02:13 AM2016-05-10T02:13:59+5:302016-05-10T02:13:59+5:30
एकाच वेळी सर्व शाळा भरत व सुटत असल्यामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.
नवी मुंबई : एकाच वेळी सर्व शाळा भरत व सुटत असल्यामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. याकरिता वाशी व कोपरखैरणे विभागातील शाळा प्रशासनांची सोमवारी बैठक घेण्यात आली. टप्प्याटप्प्याने आयुक्तालय क्षेत्रातील शाळा व्यवस्थापनांच्या बैठका घेऊन ज्या विभागात जास्त शाळा आहेत, त्यांच्या वेळेमध्ये काहीसा बदल करण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आहे.
वाढत्या शाळा महाविद्यालयांमुळे नवी मुंबई हे एज्युकेशन हब बनत चालले आहे. महापालिकेसह सिडकोकडून शाळांसाठी मिळणाऱ्या सुविधांमुळे अनेक शैक्षणिक संस्थांनी नवी मुंबईत जाळे पसरवले आहे. त्यानुसार पनवेल, वाशी, कोपरखैरणे यासह इतर अनेक विभागांमध्ये मोठ्या संख्येने शाळा व महाविद्यालये आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या शाळांकडून प्राथमिक व माध्यमिक वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस चालवल्या जात आहेत, तर महाविद्यालयीन तरुणांकडून खासगी कार व मोटारसायकलींचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. यामुळे सर्व शाळा-महाविद्यालये भरण्याची व सुटण्याची वेळ समान असल्यामुळे ज्या विभागात ज्यास्त शाळा महाविद्यालये आहेत, त्या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे.
सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसत आहे. परिणामी अशा ठिकाणच्या वाहतूककोंडीच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त होत आहे. यानुसार वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून ज्या विभागात अनेक शाळा महाविद्यालये आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. याकरिता वाशी येथे सोमवारी शाळा व्यवस्थापनांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये वाशी व कोपरखैरणे विभागातील २६ शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापनांनी आपापसात संगनमत करून शाळांच्या वेळांमध्ये १० ते १५ मिनिटांचा फरक ठेवण्याचे सुचित केल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले. सध्या सर्वच शाळा सकाळी ७ ला भरत असून दुपारी १२ ला सुटतात. यामुळे सर्व शाळांच्या स्कूलबस किंवा विद्यार्थ्यांची वाहने एकाच वेळी रस्त्यावर निघून वाहतूककोंडी होते.
अशावेळी शाळा व्यवस्थापनांनी त्यांच्या वेळेत १० ते १५ मिनिटांचा फरक ठेवल्यास एकाच वेळी रस्त्यावर निघणाऱ्या शालेय वाहनांचे विभाजन होऊन वाहतूककोंडी टळू शकेल, असा विश्वासही उपायुक्त साळवे यांनी व्यक्त केला आहे. हीच संकल्पना संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात ज्या विभागात जास्त शाळा असल्याने वाहतूककोंडी होत आहे, त्या ठिकाणी राबवण्याचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. याकरिता संबंधित शाळा प्रशासनांच्या बैठका घेऊन जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळांच्या सुधारित वेळा निश्चित केल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)