नवी मुंबई : श्री गणेशाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून, आवश्यक ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्तही लावण्यात आला आहे. विसर्जनदरम्यान कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे.गणेशाच्या आगमनानंतर अवघ्या दीड दिवसांपासून विसर्जनालाही सुरुवात झाली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेशाची स्थापना करून त्याची आराधना केली जात आहे. या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडावे, अशी पोलिसांची धारणा आहे. त्याकरिता गणेशस्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. ज्याप्रमाणे शांततेत व शिस्तबद्धरीत्या गणेशाचे आगमन झाले. त्याचप्रमाणे विसर्जनालाही कसलेही गालबोट लागू नये, याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. गौरीसोबत विसर्जन केल्या जाणाºया गणेशमूर्तींची संख्या जास्त असल्याने ३१ आॅगस्ट रोजीच्या विसर्जनाला व अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाºया विसर्जनाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शहरात २३हून अधिक ठिकाणी विसर्जन केले जाणार असून, त्याकरिता पालिका प्रशासनाने सर्वच विसर्जन ठिकाणांवर आवश्यक सुविधा पुरवल्या आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक व शहर पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली आहे.ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन होणार असल्याने विसर्जनस्थळांच्या सर्वच मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वाशी विभागासह, जुईनगर, सानपाडा, कोपर खैरणे येथेही मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असते. यानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाशीतील शिवाजी चौक ते विसर्जन तलावापर्यंतचा एक मार्ग गणेशमूर्तींच्या वाहनांसाठी राखीव ठेवला जाणार आहे. त्याशिवाय वाशी कोपरखैरणे मार्गावरही पोलीस बंदोबस्त लावून विसर्जनासाठी येणाºया गणेशमूर्तींच्या मार्गात अडथळा होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे.जुईनगरमधील गावदेवी चौक व माणिकराव बडोबा पाळकर चौकाच्या दिशेने येणारी व जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या मार्गावर विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. तर कोपरखैरणे येथील कलश उद्यान चौक ते वरिष्ठा चौक, सिरॉक प्लाझा ते शंकर मंदिर (खाडीकिनार) या मार्गावर वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात आले आहे. तर वरिष्ठा चौकापासून विसर्जन तलावाच्या मार्गावर विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.विसर्जनाच्या ५,७ व १२व्या दिवशी सर्वच विसर्जन स्थळ व विसर्जन मार्गांवर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. विसर्जनासाठी गणेशमूर्ती नेल्या जात असताना, कुठे वाहतूककोंडी होऊ नये, याकरिता आवश्यक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काही मार्गांवर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, काही मार्गांवर वाहने थांबवण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचना वाहतूक शाखेमार्फत विभागनिहाय जारी करण्यात आली आहे. यानुसार विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी बंदोबस्तावरील पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- नितीन पवार,पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा.
विसर्जनासाठी वाहतुकीत बदल, तलावांच्या मार्गावर प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 4:20 AM