शालेय सहलींचा बदलतोय ट्रेंड
By admin | Published: February 8, 2016 02:48 AM2016-02-08T02:48:40+5:302016-02-08T02:48:40+5:30
ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे, विविध संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे तसेच वाचनालये अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात
सिकंदर अनवारे, दासगाव
ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे, विविध संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे तसेच वाचनालये अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात; मात्र हा ट्रेंड आता काळाबरोबर बदलण्याची प्रथा शैक्षणिक संस्था करीत आहेत. मोठ्या शहरांतील इंग्रजी तसेच इंटरनॅशनल नावाच्या निवासी शाळांच्या सहली वॉटर पार्क, समुद्रकिनारी काढल्या जात आहेत. आता याचे अनुकरण छोट्या शहरातील शाळादेखील करू लागल्या आहेत. शैक्षणिक सहल या व्याख्येलाच फाटा फोडणाऱ्या शाळांवर कारवाईची गरज मुरुडमधील दुर्घटनेनंतर समोर येत आहे.
मुरुड समुद्रकिनाऱ्यावर घडलेली दुर्घटना दुर्दैवी असली तरी या घटनेने शैक्षणिक सहली आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा याबाबत प्रश्न निर्माण केला आहे. मुळातच शैक्षणिक सहली पूर्वीपासून विविध ऐतिहासिक स्थळे, शैक्षणिक किंवा औद्योगिक संकुले, कारखाने, वस्तुसंग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे आदी ठिकाणी नेल्या जात होत्या. याबाबत विद्यार्थ्यांनादेखील उत्सुकता निर्माण होत असे. पुस्तकात वाचत असलेले स्थळ समोर पाहताना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आपोआपच जागी होते.
ऐतिहासिक स्थळांमधून प्रेरणा मिळते. तर कारखान्यात कोणती वस्तू कशी बनते, हे पाहताना विद्यार्थ्यांना उत्सुकता निर्माण होते. अशा शैक्षणिक सहलींमधून मुलांच्या अभ्यासात आणि बुध्दीत अवांतर भर पडते. आजही अनेक ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांचा कल हा ऐतिहासिक स्थळे पाहण्याकडेच अधिक प्रमाणात
आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या सहली या केवळ सहली नसून त्या शैक्षणिक सहली आहेत. मात्र या संकल्पनेला फाटा देत मोठ्या शहरांतील किंवा इंग्रजी निवासी शाळांचा कल हा वॉटर पार्क आणि समुद्रकिनारे पाहण्याकडेच वळला आहे. यामुळे आता या सहली विद्यार्थ्यांच्या मौजमजेच्या होत चालल्या आहेत. त्यातून शैक्षणिक हा विषय दूर गेला आहे. अशा धोकादायक ठिकाणी काढण्यात आलेल्या सहलींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र मुरुड घटनेने ऐरणीवर आला आहे.
शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून पूर्वपरवानगी काढणे गरजेचे असते. त्या परवानगीनंतर सहलीची जबाबदारी ही त्या शाळेची असते. ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थी, शाळा आर्थिक विवंचनेला तोंड देत सहलींचे आयोजन करतात. त्यामुळे वॉटर पार्कसारखी खर्चीक ठिकाणे या ग्रामीण सहलींना परवडत नाहीत.सहलींचा बदलता ट्रेंड पाहता सहली काढताना शाळांकडे पुरेसा कमचारीवग देखील उपलब्ध नसतो. एका सहलीमध्ये किमान १०० च्या वर मुलांचा समावेश असतो, मात्र त्या मानाने शिक्षकांची संख्या कमी असते. अनेक शाळांकडून सहली काढताना खासगी वाहनांचा वापर केला जातो. सर्वत्र एसटी महामंडळाच्या गाड्यांना सुरक्षेकरिता प्राधान्य असताना खासगी वाहनांच्या केलेल्या वापराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्र ही ऐतिहासिक, सांस्कृतिक भूूमी आहे. या भूमीमध्ये अनेक राजे, संत, विचारवंत, वैज्ञानिक, लेखक घडले आहेत. अशा महाराष्ट्रात गडकिल्ले, पुरातन मंदिरे, तलाव, लेणी, ब्रिटिशकालीन वास्तू आदी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र बदलत्या शैक्षणिक सहलींच्या ट्रेंडने याचा विसर पडत आहे.