संदीप जाधव, महाडबदलत्या हवामानासह वाढत्या उष्णतामानाचा मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे. महाड तालुक्यात उष्माघातामुळे अनेक बालरुग्णांना उलट्या, जुलाबासारखे आजार सध्या बळावत असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपासून दिवसभरात वाढता उन्हाळा तसेच वातावरणातील बदल होत आहे. महाडमध्ये उष्णतेचा पारा ४२ अंशावरही जात असून, या उन्हामध्ये प्रौढ व्यक्तीसह लहान मुलेदेखील त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. रक्तदाब कमी होणे, शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी होणे, क्वचित झटके येणे, चक्कर येणे अशा प्रकारची लक्षणे या आजारात दिसून येत आहेत. ग्रामीण भागात उष्णतेची दाहकता अधिक असल्याने शेतावर काम करणारे शेतकरी, शेतमजूर यांना ही अधिक तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. तापमानात झालेल्या वाढीचा जनावरांनाही त्रास होत आहे. मात्र या तपमानाचीच झळ लहान मुलांना मोठ्या प्रमाणात बसत असून उलट्या, जुलाब, डोकेदुखी, तापासारख्या आजारांचे अनेक बालरुग्ण उपचार घेत आहेत.च्रायगड जिल्ह्यात तपमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मध्येच अचानक ढगाळ वातावरण होत आहे, अशा प्रकारे वारंवार हवामानात होणारा बदल हा आरोग्यास धोकादायक ठरत आहे. यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे रस्त्यावर छत्री, रु माल बांधून फिरणारे नागरिक दिसून येत आहेत.
बदलत्या हवामानाचा फटका
By admin | Published: April 05, 2016 1:33 AM