नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध मार्केटमध्ये दिवसभर श्रीरामाचा जयघोष सुरू होता. भाजीपाला मार्केटमध्ये रामकथेचे आयोजन केले होते. रथ यात्रेमध्ये व्यापारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मसाला, धान्य व कांदा- बटाटा मार्केट मध्येही भजन, महाआरती व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
भाजीपाला घाऊक व्यापारी महासंघ, अग्रहरी समाज विकास सेवा संस्था, उडान सामाजिक संस्थेसह मार्केटमधील सर्व संघटनांच्या वतीने दोन दिवसाच्या उत्सवाचे आयोजन केले होते. रविवारी रामकथेला सुरुवात करण्यात आली. सोमवारी सकाळी रामकथा वाचन पूर्ण करण्यात आले. होम हवन, महाआरतीनंतर मार्केटमधून रथयात्रा काढण्यात आली. यावेळी श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण मार्केट परिसर दुमदुमून गेला होता. कांदा बटाटा मार्केटमधील मंदिरामध्येही भजन व आरती सोहळ्याचे आयोजन केले होते. मसाला मार्केटमध्येही उत्सवाचे आयोजन केले होते. महाआरतीला कामगार व्यापारी उपस्थित होते. धान्य मार्केटमधील ग्रोमा संघटनेच्यावतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मार्केटमध्ये सर्व ठिकाणी भगते ध्वज लावण्यात आले होते.
मार्केट आवारात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. रामकथा व रथयात्रेचे आयोजन केले होते. व्यापारी, कामगार व सर्व घटक या उत्सवात सहभागी झाले होते.
- शंकर पिंगळे, संचालक भाजीपाला मार्केट
मार्केटमध्ये भक्तीमय वातावरण आहे. मसाला मार्केटमध्ये भंडाऱ्याचे आयोजन केले होते. सोमवारी मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन केले होते. सर्व व्यापारी, कामगार यांना लाडूचे वितरण करण्यात येणार आहे.
- कीर्ती राणा, माजी संचालक मसाला मार्केट