नवी मुंबई : आजाद मैदानावर धडक देण्यासाठी निघालेले मराठा आंदोलक २५ जानेवारीला नवी मुंबईत मुक्कामी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबईमधील सकल मराठा समाज एकवटला आहे. आंदोलकांना जेवण, पाणी, आरोग्यासह राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. समाजबांधवांनी चार भाकरी प्रेमाच्या, सोबत चटणी लसूण शेंगदाण्याची उपक्रम सुरू केला असून, यालाही नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो समाजबांधव २६ जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत. आरक्षण दिंडी २५ जानेवारीला पनवेल, कळंबोली, खारघर मार्गे नवी मुंबईत दाखल होणार आहे. येथे आंदोलक मुक्काम करणार आहेत. आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी सकल मराठा समाजाच्या प्रत्येक विभागातील पदाधिकाऱ्यांनी नियोजन सुरू केले आहे. आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी चार भाकरी प्रेमाच्या सोबत चटणी लसूण शेंगदाण्याची अभियान घणसोलीमधील मराठा समाजाने सुरू केले. या उपक्रमाला संपूर्ण नवी मुंबईतून प्रतिसाद वाढत आहे. प्रत्येक घरातून चार भाकरी घेऊन समाजबांधव मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. अनेक विभागात भाकरी संकलित करून त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचविल्या जाणार आहेत.
हजारोंच्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांच्या मुक्कामाची सोय कुठे करायची याचे नियोजनही सुरू केले आहे. मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन मार्केटमधील गोडावून, मोकळ्या जागा, लिलावगृहामध्ये मुक्कामाची सोय करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. याशिवाय महिलांसाठी सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये सोय करण्याचे नियोजन आहे. आंदोलकांची संख्या वाढल्यास महानगरपालिकेच्या मैदानांमध्ये मुक्कामाचे नियोजन केले जाणार आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोरील विविध राज्यांच्या भवननाही पत्र देऊन आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
............आंदोलनासाठीचे आतापर्यंतचे नियोजन
सकल मराठा समाजाकडून चार भाकरी प्रेमाच्या उपक्रम सुरू
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्कामासाठी जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा.सिडको प्रदर्शन केंद्र व शहरातील मैदानांची चाचपणी
सर्व प्रमुख रुग्णालयांना पत्र देऊन वैद्यकीय साहाय्य देण्याचे आवाहनसर्व विभागातील सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजन बैठकांचा धडाका
विभागवार स्वयंसेवकांची नोंदणी सुुरू