सीआयएसएफ जवानाकडून अल्पवयीन मुलींचा पाठलाग; नागरिकांनी दिला चोप
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 8, 2023 05:54 PM2023-09-08T17:54:03+5:302023-09-08T17:54:08+5:30
आर्मीत असल्याचे सांगत जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न
नवी मुंबई : अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्याशी जवळकी साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीएआयएसएफ जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे मुली व पालक भयभीत झाले होते. अखेर हा प्रकार उजेडात येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून जवानाला अटक केली आहे.
वाशी सेक्टर ९ येथे अनेक दिवसांपासून हा प्रकार घडत होता. वाशीतील सीएआयएसएफ कॉलनी मध्ये राहणारा सुरजकुमार राम (२५) हा परिसातून ये जा करणाऱ्या अल्पवयीन मुलींचा पायी पाठलाग करत त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. तर मुलींनी त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिल्यास आपण आर्मीत असल्याचे सांगून मला भाऊ माना असे देखील सांगून तो त्यांच्यासोबत जवळकी साधायला पाहत होता. अनेक मुलींसोबत त्याठिकाणी असा प्रकार घडत असताना काही दिवसांपूर्वी काही नागरिकांनी त्याला मुलींचा पाठलाग करताना पकडून चोप देखील दिला होता.
परंतु घटनेमुळे भयभीत झालेल्या अल्पवयीन मुली व पालक यांनी पोलिसांकडे तक्रार टाळली होती. अखेर सर्व मुली व पालक यांची पोलिसानं भेट घेऊन त्यांना धीर दिल्यानंतर बुधवारी रात्री याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सूरजकुमार याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा जम्मूचा असून यापूर्वी वैष्णोदेवी येथे नियुक्ती असताना त्याठिकाणी देखील दोनदा त्याला अशाच प्रकरणातून नागरिकांनी चोप दिल्याचे समोर आले आहे. तर याच कारणावरून त्याच्यावर कारवाई करून नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे असेही समजते. मात्र वाशीत देखील त्याने असेच कृत्य केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तर त्याच्या अशा कृत्यांमुळे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.