शिवप्रेमींनी गड किल्यांवर साजरा केला दसरा; गडाला बांधले तोरण
By नामदेव मोरे | Published: October 5, 2022 09:19 PM2022-10-05T21:19:12+5:302022-10-05T21:19:22+5:30
पारंपारीक पद्धतीने शस्त्रपुजनासह मिरवणुकीचे आयोजन
नवी मुंबई : दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दसऱ्यानिमीत्त आधी तोरण गडाला मग माझ्या घराला हा उपक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्ह्यातील मृगगड, मानगड व सुरगडसह राज्यातील विविध किल्यांवर पारंपारीक पद्धतीने दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. गडाला तोरण बांधून, शस्त्रपुजन करत शिवकालीन विशभुषा परिधान करून मिरवणूक काढण्यात आली.
राज्यातील गड, किल्यांचे संवर्धन करण्यासाठी योगदान देणाऱ्या संस्थांमध्ये दुर्गवीर प्रतिष्ठानचाही समावेश आहे. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर गड संवर्धनासाठी श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जाते. गडावरील पुरातन वास्तूंचे संवर्धन, स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. प्रत्येक वर्षी गडावर दसरा साजरा केला जातो. यावर्षीही संस्थेचे संस्थापक संतोश हसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयोदुर्गोत्सव मोहीम राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यामधील मृगगड, मानगड व सुरगड या किल्यांवर पहाटेच दुर्गवीरांनी उपस्थिती लावली.
गडाच्या दरवाजाला तोरण बांधण्यात आले. गडावरील मंदिरामध्ये पारंपारीक पद्धतीने शस्त्र पुजन करण्यात आले. मंदिर, दरवाजांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. मावळ्यांच्या वेशामध्ये गडावरून मिरवणूक काढण्यात आल्या. शिवकाळात ज्या पद्धतीने गडावर दसरा साजरा केला जायचा, सोने लुटले जायचे त्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषांनी गडांचा परिसर दुमदुमून गेला होता. मृगगड, मानगड व सुरगडावर सुरू असलेल्या संवर्धन मोहिमा यापुढेही सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी शिवप्रेमींनी केला. गड, किल्यांचे संवर्धन व्हावे. हा ऐतीहासीक ठेवा टिकावा, पुढील पिढीला पाहता यावा, गड किल्यांचा इतिहास, तेथील वास्तूरचना, जलसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, सुरक्षेसाठी घेतलेली काळजी ही सर्व माहिती पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे व योगदान देण्याचे आवाहन यावेळी शिवप्रेमींनी व्यक्त केले.
राज्यभर विजयोदुर्गोत्सव
रायगड जिल्हाप्रमाणे राज्यातील इतर गड, किल्यांवरही दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. भास्करगड, महिपतगड, महिमतगड, रामगड, कलानिधीगड, सामानगड, सडा किल्ला व इतर किल्यांवरही दसरा साजरा करण्यात आला.