पैसे चोरीच्या संशयावरून विद्यार्थिनीला दिले चटके
By admin | Published: February 2, 2017 02:55 AM2017-02-02T02:55:30+5:302017-02-02T02:55:30+5:30
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश स्कूलमध्ये ११ वर्षीय विद्यार्थिनीला लोखंडी उलथण्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश स्कूलमध्ये ११ वर्षीय विद्यार्थिनीला लोखंडी उलथण्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पालक तिला भेटण्यासाठी पेणहून पनवेल- सुकापूर येथील शाळेत आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा बेडदे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश स्कूलमधील शिक्षिकेचे १०० रुपये चोरीला गेल्यावरून शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी १८ जानेवारीला चौथीत शिक्षण घेणाऱ्या हर्षदा गंगाराम लेंडी (११) हिच्यावर चोरीचा आरोप करत शरीरावर लोखंडी उलथण्याने चटके दिले. शाळेत ५५ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामधील ३२ निवासी आहेत. पैसे चोरल्यानंतर कबुली दिली नसल्याने मुख्याध्यापिका बडदे यांनी हर्षदाला मारहाण केली व चटके दिले. या घटनेनंतर घाबरून विद्यार्थी गप्प बसले होते. प्रत्येक महिन्याच्या ३० व ३१ तारखेला मुलांचे आई-वडील मुलांना भेटण्यासाठी शाळेत येतात. हर्षदाचे वडील देखील तिला भेटण्यासाठी शाळेत आले असताना तिच्या पाठीवर चटके दिले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तिला विचारले असता या घटनेची माहिती दिली.
हा प्रकार गंभीर असल्याने पालकांनी कमलाकर हिलम व इतरांना सोबत घेऊन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय गाठले व शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर याच शाळेतील इतर ७ विद्यार्थ्यांनाही शिक्षिकेने चटके दिले असल्याचे कमलाकर हिलम यांनी सांगितले. जयेंद्र मारु ती पिंगळा, जितेश अंबाजी पिंगळा, संतोष गौऱ्या भस्मा,करु णा नांग्या पिंगळा, जान्हवी रामा भस्मा, नरेश लहू उघडा, ओमकार नामदेव शिद अशी अन्य ७ जणांची नावे आहेत. बुधवारी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये मुख्याध्यापिका सुविधा बेदडे हिच्याविरोधात कलम ३२४ व ५०६ व बाल न्याय अधिनियम मुलांचे काळजी व रक्षण कलम ७५अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत. मुख्याध्यापिकेवर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे.
मुलांना अन्यायकारक वागणूक व मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी व त्यांच्याविरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखल व्हावा.
- गंगाराम लेंडी, पालक
विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढे तपास करत आहोत.
- प्रकाश निलेवाड,
सहाय्यक पोलीस आयुक्त