शाडूच्या मूर्तींचे माहेरघर चिरनेर कलानगर
By admin | Published: July 21, 2015 04:11 AM2015-07-21T04:11:31+5:302015-07-21T04:11:31+5:30
गणेशोत्सवाला दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे चिरनेर-कलानगरातील गणेशमूर्ती घडविणाऱ्या कारागिरांचे हात यंत्रवत चालायला
उरण : गणेशोत्सवाला दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे चिरनेर-कलानगरातील गणेशमूर्ती घडविणाऱ्या कारागिरांचे हात यंत्रवत चालायला लागले आहेत. शाडूच्या गणेशमुर्ती बनविण्यासाठी नजिकच्या काळात चिरनेर चांगलेच प्रसिद्धीस येऊ लागले आहे. चिरनेरच्या कलानगरीतील अवघी कुटुंबच शाडूच्या गेणशमूर्ती घडविण्यात मग्न झाली आहेत.
गणेशाच्या मुर्तीसाठी पेण प्रसिद्ध आहे. मात्र शाडूच्या गणेशमूर्तीसाठी चिरनेर येथील कलानगर हे नाव काही वर्षांपासून प्रसिद्धीस येऊ लागले आहे. चिरनेर म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते स्वातंत्र्यसंग्रामातील १९३० साली झालेल्या ऐतिहासिक जंगल सत्याग्रह. त्यामुळे चिरनेर गाव आधीपासूनच ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जातं. त्यात भर पडली ती तेथील प्राचीन गणेशमंदिराची. येथील महागणपतीची किर्ती सर्वदूर पोहचलीय. त्याच ऐतिहासिक चिरनेरमध्येच कलानगर वसलयं. ३५ ते ४० कुटुंबियांचे कलानगर. परंतु प्रत्येक घरात गणेशमूर्ती बनविल्या जातात. या कलानगरातच गणेशमूर्ती बनविण्याचे सुमारे ३०-३५ कारखाने आहेत. पारंपरिक मुर्तीकलेचे बीज कलानगरात घराघरातून जोपासलं जातयं.
पिढ्यानपिढ्या सुरु असलेल्या मूर्तीकलेचा व्यवसाय वाढत्या महागाईतही टिकविण्यासाठी मूर्तीकारांना धडपड करावी लागत असली तरी त्याचा परिणाम त्यांच्या मूर्तीकलेवर होताना दिसत नाही.
मुर्ती घडविण्यासाठी लागणारी शाडूची माती,रंग आणि कारागिरांच्या मोबदल्यात प्रत्येक वर्षी ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ होते.
त्यामुळे मूर्ती व्यावसायिकांना वाढत्या महागाई बरोबरच घटत्या कारागिरांच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. मुर्ती घडवून अधिक नफा मिळवून देणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मुर्तींपेक्षा शाडूच्या मुर्ती बनविण्यात अधिक मेहनत, वेळ आणि पैसा लागतो. (वार्ताहर)