- नामदेव मोरे, नवी मुंबईसुनियोजित शहर म्हणून मिरवणाऱ्या नवी मुंबईत खिशाला परवडणारे औषधोपचार हे दिवास्वप्नच ठरत आहे. शहरातील ६१ रुग्णालयांत तब्बल तीन हजार ९२१ बेड आहेत. परंतु यानंतरही शहरवासीयांना स्वस्तात उपचार उपलब्ध होत नाहीत. सुपर स्पेशालिटी उपचार सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून त्यासाठी रुग्णांना मुंबईतील रुग्णालयांचाच आधार घ्यावा लागत आहे. सिडकोने शहर वसविताना प्रत्येक नोडमध्ये अत्यावश्यक सुविधांसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. रुग्णालयांसाठीही प्रत्येक नोडमध्ये भूखंड आहेत. अनेकांना अत्यंत नाममात्र दरात जागा दिली आहे. सद्यस्थितीमध्ये शहरात ६१ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये ३९२१ बेड उपलब्ध आहेत. अनेक रुग्णालयांत मंजूर बेडपेक्षा जास्त बेड टाकले असून ही संख्या चार हजारपेक्षा जास्त होते. वाशीमध्ये महापालिकेचे ३०० बेड क्षमतेचे प्रथम संदर्भ रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली व नेरूळमध्ये माता-बाल रुग्णालये आहेत. परंतु यामधील नेरूळ व ऐरोलीतील रुग्णालय असून नसल्यासारखे आहे. वाशी रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी उपचार उपलब्ध होत नाहीत. कॅन्सर, हृदयविकार, बे्रन ट्युमर, मणक्याचे गंभीर आजार व इतर महत्त्वाच्या आजारांवर उपचार होत नाहीत. हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयामध्ये पालिकेच्या कोट्यातील ३० बेड आहेत. परंतु त्या ठिकाणी अद्याप आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील एकही रुग्णावर उपचार झालेले नाहीत. गरीबांना तिथे जाताच येत नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तिथे गेल्यानंतर हजारो रुपये मोजावे लागतात. गंभीर आजारांचे बिल काही लाखांमध्ये जाते. धर्मादाय संस्थांची अनेक मोठी रुग्णालये आहेत. त्यांना नियमाप्रमाणे किमान १५ टक्के रुग्णांवर मोफत उपचार करणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात अपवाद वगळता कोणत्याही रुग्णालयांमध्ये स्वस्तात उपचार होत नाहीत. नवी मुंबईमध्ये रुग्णालयांची संख्या पुरेशी असली तरी सर्वसामान्य नागरिकांना महत्त्वाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील सायन, जेजे, केईएम व इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. कॅन्सरसाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाशिवाय समर्थ पर्याय नाही. महापालिका प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात तरतूद करते, परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच उपाययोजना करत नाहीत.किडनीचे आजारांसाठी डायलेसिस करण्यासाठीही पुरेशी सुविधा नाही. यामुळे बहुतांश रुग्णांना सुपर स्पेशालिटी उपचारांसाठी शहराबाहेर जावे लागते. महापालिकेने नेरूळ व ऐरोलीमध्ये १०० बेडची रुग्णालये उभारली आहेत. परंतु ती वेळेवर सुरू करण्यात अपयश आले आहे. पालिकेच्या अपयशाचा फायदा खासगी रुग्णालयांना होत आहे. लोकप्रतिनिधीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.
सामान्यांसाठी स्वस्त उपचार दिवास्वप्नच
By admin | Published: July 17, 2015 2:49 AM