बजेट होमच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक
By admin | Published: June 15, 2015 05:52 AM2015-06-15T05:52:52+5:302015-06-15T05:52:52+5:30
शून्य टक्के व्याजातून सहज मिळणारे कर्ज आणि विकासकाच्या बजेट होम्सच्या भूलथापांमुळे पनवेलमध्ये ५५ ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार
वैभव गायकर, पनवेल
शून्य टक्के व्याजातून सहज मिळणारे कर्ज आणि विकासकाच्या बजेट होम्सच्या भूलथापांमुळे पनवेलमध्ये ५५ ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ‘स्वप्न नगर बजेट होम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स’विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी पोलीसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने लाखोंची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक मोकाट फिरत आहेत.
पनवेलपासून नऊ कि. मी. अंतरावर असलेल्या दुंदरे याठिकाणी स्वप्न नगर बजेट होम हा प्रकल्प आहे. २०१०मध्ये बजेट होमच्या नावाने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या ‘न्यू बजेट होम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स’ने ग्राहकांकडून लाखो रु पये उकळले आहेत. सदर घरांची योजना ही शून्य टक्के ईएमआय आधारावर तयार झाली. ५५ मध्यमवर्गीय ग्राहकांनी बजेट होममध्ये घर बुक केले. २०१० मध्ये सदनिका खरेदीसाठी यातील प्रत्येक ग्राहकाने एक लाख रु पये विकासक शशिकांत चौधरी व नितीन झेंडे यांना दिले. त्यानंतर सादर केलेल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने दहा ते पंधरा वर्षांप्रमाणे शून्य टक्के व्याजदराने पाच ते सात हजार हप्ता फायनान्स कंपनीला देणे सुरू झाले. सतत मासिक हप्ते भरून देखील बांधकाम पूर्णत्वाला येत नव्हते, तसेच विकासकांकडून देण्यात आलेल्या १८ महिन्यांचा कालावधी देखील संपला. २०११ साली डिसेंबर महिन्यात ग्राहकांचा रोष पाहता या बांधकाम व्यावसायिकांनी बंद असलेले काम सुरू करण्याचे आश्वासन देत ग्राहकांकडून प्रत्येकी ३0 हजार घेतले.
यासंदर्भात विकासकाने बैठक घेऊन ग्राहकांकडून २० टक्के रकमेची पुन्हा एकदा मागणी केली. तसेच दुसरा पर्याय सुचवत शून्य टक्के ही योजना बाजूला ठेवून नवीन लोनसाठी ग्राहकांनी आमच्याकडे पेपर द्यावेत असे सांगितले. फसवणूक झाल्यानंतर खांदेश्वर पोलीसांत तक्रार केल्याचे रत्नाकर बोरसुतकर यांनी सांगितले.