नवी मुंबई : रशियामध्ये इंजिनीअर पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ६० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सुरतमधील व्यक्तीने वाशी पोलिसांकडे तक्रार केली असून, संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इतरही अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मेहुल पाडवी (३६) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सुरतचे राहणारे असून त्यांना ओमान व अफ्रिका या देशांमध्ये सिव्हिल इंजिनीअरच्या कामाचा अनुभव आहे. मागील काही महिन्यांपासून ते सुरत येथे नोकरी करत होते. मात्र, पुन्हा विदेशात नोकरी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. यादरम्यान फेसबुकवरून त्यांना वाशीतील एका कंपनीची माहिती मिळाली. यानुसार त्यांनी सदर कंपनीला बायोडाटा इमेल केला असता, त्यांना रशियामध्ये नोकरी मिळाल्याचे सांगण्यात आले होते. यानुसार त्यांनी कार्यालयात संपर्क साधला असता, त्यांना वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी ६० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार पाडवी यांनी दोन टप्प्यात राहुल मिश्रा नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात ६० हजार रुपये भरले. त्यानंतर काही दिवसांत त्यांना व्हिजा पाठवण्यात आला. मात्र, पुढील प्रक्रिया व विमानाचे तिकीट पाठवण्यास टाळाटाळ होत होती. यामुळे पाडवी यांनी दिलेली रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना टाळाटाळ करण्यात आली. यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली. त्याआधारे वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.