पनवेल : ओएलएक्स या अॅपवरती मोटारसायकलचे एक लाख २० हजार रुपये भरूनही मोटारसायकल न देता ३२ वर्षीय व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्टर २० रोडपाली, कळंबोली येथील सुशांत संभाजी रसाळ यांना दुचाकी घ्यायची होती. ते ओएलएक्स अॅप पाहत असताना बिमल सरकार (रा. धरणपूर, बकाली जलपानगुरी, पश्चिम बंगाल) या व्यक्तीने यामा मोटार सायकल विकण्यासाठीची जाहिरात टाकली होती. ही मोटारसायकल रसाळ यांना आवडली असल्याने त्याने बिमल यांच्याशी संपर्क केला. या वेळी त्याने मोटारसायकलचे फोटो पाठविले. तसेच बिमल हा दुचाकीचा डिलर असल्याचे रसाळ याला सांगितले. या वेळी ही मोटारसायकल लोकेश विजय शंकर (ता. टिप्पतूर, जि. तुमपूर) यांच्या नावे असल्याचे सांगून त्याने या मोटारसायकलचे आरसी बुकचा फोटो रसाळ याच्या व्हॉट्सअॅपवरती पाठविला. तसेच बिमल सरकारने त्याचा आधार कार्ड, व्हिजिटिंग कार्ड आणि त्याचा बँकेचा खाते क्रमांक पाठविला. त्यानंतर रसाळ याने मोटारसायकल ही एक लाख २० हजारला विकत घेतली व ते पैसे आॅनलाइन ट्रॅन्झाक्शनने बिमल सरकार यांच्या अकाउंटवर जमा केले.पैसे जमा केल्यानंतर रसाळ याने बिमल सरकार याला वारंवार फोन केला असता त्याने फोन उचलणे बंद केले आहे. त्या वेळी विमल सरकार याने आपली फसवणूक केली असल्याचे रसाळ यांच्या लक्षात आले. एक लाख २० हजार रुपये भरून देखील मोटरसायकल न दिल्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्यात विमल सरकार याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.