मदतीच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: October 17, 2015 02:08 AM2015-10-17T02:08:15+5:302015-10-17T02:08:15+5:30
रुग्णांना मदतीच्या नावाने निधी जमवणाऱ्या बनावट संस्था शहरात सक्रिय असून, रेल्वेत त्यांचे जाळे पसरले आहे. रेल्वे प्रवाशांपुढे मदतीचे आवाहन करीत या संस्था त्यांच्याकडून निधी उकळत आहेत
नवी मुंबई : रुग्णांना मदतीच्या नावाने निधी जमवणाऱ्या बनावट संस्था शहरात सक्रिय असून, रेल्वेत त्यांचे जाळे पसरले आहे. रेल्वे प्रवाशांपुढे मदतीचे आवाहन करीत या संस्था त्यांच्याकडून निधी उकळत आहेत. अशा बनावट संस्थांचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर हल्ल्याची गंभीर घटना नेरूळ येथे घडली आहे.
कॅन्सरग्रस्तांवर उपचारासाठी मदत निधी जमविणारे अनेक जण रेल्वेत पाहायला मिळतात. उच्च शिक्षित तरुण-तरुणी हातात प्लास्टिकचा डबा घेऊन हा निधी जमवत असतात. परंतु मदत निधीच्या बहाण्याने प्रवाशांना लुटण्याचे हे जाळेच बनावट संस्थांनी पसरवले आहे. पनवेल व वाशी परिसरात अशा काही बनावट संस्थांनी आपली कार्यालये थाटली आहेत. सढळ हाताने मदतीचे आवाहन करणाऱ्या या तरुण-तरुणींच्या कथित गोष्टींना भुलून अनेक जण १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतची मदत करतात. मात्र ज्या भावनेने त्यांनी मदत केलेली असते, त्याप्रमाणे रकमेचा वापर न करता तिजोरी भरण्याचे काम या संस्था करीत आहेत. अशाच एका बोगस संस्थेचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न वाशीचे रहिवासी वसंत भिडे या ज्येष्ठ नागरिकाने केला. वाशी ते पनवेलदरम्यान ते रेल्वेने प्रवास करीत असताना युमिंग फाउंडेशनचे ओळखपत्र दाखवून मदत निधी जमवत होते. (प्रतिनिधी)