पनवेलमध्ये एकाच शेतजमिनीची अनेकांना विक्री करून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:49 PM2019-05-28T23:49:50+5:302019-05-28T23:49:55+5:30

पनवेलमध्ये शेतजमिनीची बनावट पॉवर ऑफ अटर्नी तयार करून त्या आधारे जमीन वेगवेगळ्या लोकांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Cheating by selling the same farmland to many in Panvel | पनवेलमध्ये एकाच शेतजमिनीची अनेकांना विक्री करून फसवणूक

पनवेलमध्ये एकाच शेतजमिनीची अनेकांना विक्री करून फसवणूक

Next

पनवेल : पनवेलमध्ये शेतजमिनीची बनावट पॉवर ऑफ अटर्नी तयार करून त्या आधारे जमीन वेगवेगळ्या लोकांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी १० जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला आहे.
कोन गावात शकुंतला नारायण म्हात्रे व त्यांची बहीण कुसुम अनंता माळी राहत असून त्यांची आई बाली नामदेव पाटील यांना वारसाहक्काने मौजे वारदोली शिवारात सर्व्हे नं./गट नं.११९/२६ ही जमीन मिळाली होती. आईच्या मृत्यूनंतर ही जमीन शकुंतला म्हात्रे व कुसुम माळी यांना वारसा हक्काने मिळाली आहे. त्यानंतर रवींद्र राणे (एजंट) यांची ओळख २००० मध्ये शकुंतला यांचे पती नारायण म्हात्रे यांच्या सोबत झाली व त्यांनी त्या जमिनीची विक्री करायचे ठरविले. जमीन विकून देतो असे म्हणून रवींद्र राणे याने जमिनीचे टोकन रक्कम म्हणून ५४ हजार रुपयांचा चेक दिला. यावेळी राणेने आणलेल्या कागदपत्रावर दोघी बहिणींचे अंगठे घेऊन सोबत फोटो घेतले. त्यानंतर राणे बरेच दिवस त्यांच्याकडे आला नाही. म्हणून म्हात्रे यांनी राणे याच्याकडे जाऊन जमिनीच्या विक्रीबाबत चौकशी केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तब्बल सहा वर्षांनंतर राणे पुन्हा म्हात्रे यांच्या घरी आला आणि जुना व्यवहार रद्द झाल्याचे सांगून नवीन व्यवहार करून देतो असे सांगून शकुंतला व कुसुम यांचे कागदपत्रावर पुन्हा अंगठे घेतले व दोघींना ७४ हजार रुपये दिले. २०१३ मध्ये शकुंतला यांचा मुलगा किशोर म्हात्रे हा सर्व्हे नं./गट नं. ११९/२६ या जमिनीचा शेतसारा भरण्यासाठी तलाठी कार्यालय, भिंगार याठिकाणी गेला असता त्याला सदरची जमीन ही व्हल्युबल प्रॉर्टीज प्रा.लि.च्या नावाने असल्याचे समजले. यावेळी राणेने फसवणूक केल्याचे म्हात्रे यांच्या लक्षात आले.
>तहसील कार्यालयातही खोटी नोंद
रवींद्र राणे याने पनवेल तहसील कार्यालयामध्ये दोन वेगवेगळे बनावट पॉवर आॅफ अटर्नी तयार करून त्याच्या आधारे एकाच जमिनीची वेगवेगळ्या लोकांना विक्री केली व त्याचा मोबदला शकुंतला म्हात्रे व त्यांची बहीण कुसुम माळी यांना दिलेला नाही.पनवेल शहर पोलीस ठाण्यात रवींद्र रामदास राणे यांच्यासह १० जणांविरोधात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Cheating by selling the same farmland to many in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.