‘घरबसल्या कमवा‘ स्कीमद्वारे फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:11 AM2017-08-10T06:11:50+5:302017-08-10T06:11:50+5:30
आॅनलाइन एमएलएमच्या माध्यमातून घरबसल्या कमवण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसटीजी इन्फो कंपनीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : आॅनलाइन एमएलएमच्या माध्यमातून घरबसल्या कमवण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसटीजी इन्फो कंपनीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कंपनीत गुंतवणूक करूनही आश्वासनाप्रमाणे मोबदला मिळालेला नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
झटपट श्रीमंतीच्या प्रयत्नात असलेल्यांना गंडा घालण्याचे प्रकार देशभर घडत आहेत. अशाच एका प्रकारे नवी मुंबईत यापूर्वी अनेकांना काही बोगस कंपन्यांनी गंडा देखील घातलेला आहे. त्यानंतरही जादा नफ्याचे आमिष दाखवणाºया आॅनलाइन कंपनीत गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. अशाच एका प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार रतिरंजन राऊत यांनी एपीएमसी पोलिसांकडे केली आहे. वाशीतील सतरा प्लाझा येथील हॉटेलमध्ये त्यांची काही व्यक्तींसोबत ओळख झाली होती. यावेळी सदर व्यक्तींनी ते एसटीजी कंपनीचे एजंट असल्याचे सांगून या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळत असल्याचे सांगितले. कंपनीत ठरावीक रक्कम जमा केल्यानंतर कंपनीच्या संकेतस्थळावर झळकणाºया जाहिरातींवर क्लीक करण्यास सांगितले होते. यानुसार राऊत यांनी सदर कंपनीत सुमारे तीन लाख रुपये जमा केले होते. यानंतर काही महिने त्यांना संकेतस्थळावरील जाहिरातींवर क्लीक केल्याचा मोबदला देखील मिळाला. परंतु त्यानंतर मार्च महिन्यापासून कामाचा मोबदला मिळणे बंद झाल्याने राऊत यांनी कंपनीच्या एजंटकडे तसेच कार्यालयात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर त्यांनी कंपनीसंदर्भात चौकशी केली असता, त्यांना देशात गुंतवणूक करण्यास अनुमती नसल्याचे स्पष्ट झाले. यानुसार रतिरंजन राऊत यांनी सदर कंपनी व कंपनीचे एजंट यांच्याविरोधात एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकारात राऊत यांची १ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.