पनवेल : सहलीनिमित्त पनवेलवरून श्रीलंकेसाठी रवाना झालेल्या शेकडो पर्यटकांची एका ट्रॅव्हल्स एजन्सीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल तालुक्यातील ३५० पर्यटक पनवेलवरून चेन्नई या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांची पुढील प्रवासाची श्रीलंकेची तिकिटे रद्द झाल्याचे कळल्याने हा प्रकार उघडकीस आला. यामुळे शेकडो पर्यटकांना विमानतळावर २४ तास ताटकळत थांबावे लागले.
भारतयात्रा ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत, पनवेलमधील कोण गावातील सुरेश महाराज पाटील यांच्या पुढाकाराने सहलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतयात्रा या कंपनीचे मालक नीरज कपूर व किसन कपूर हेदेखील ३५० पर्यटकांसोबत होते. २१ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजता पनवेलवरून रेल्वेने पर्यटक चेन्नईला रवाना झाले. दुसऱ्या दिवशी ते चेन्नईला पोहोचले. तिसºया दिवशी चेन्नई शहरात फिरल्यानंतर त्या ठिकाणी मुक्काम करून चौथ्या दिवशी, २४ फेब्रुवारीला श्रीलंकेला रवाना होण्यासाठी सर्व जण चेन्नई विमानतळावर पोहोचले. ३५० जणांपैकी १०८ जण श्रीलंकेला रवानाही झाले. मात्र उर्वरित २४२ पर्यटकांची तिकिटे रद्द झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. संपूर्ण दिवस विमानतळावरच ताटकळत बसूनही श्रीलंकेसाठी तिकिटाचे नियोजन न झाल्याने संतप्त पर्यटकांनी आयोजकांना जाब विचारला. आयोजनात पुढाकार घेतलेले सुरेश महाराज १०८ जणांसोबत श्रीलंकेला रवाना झाल्याने विमानतळावरील पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. त्यांनी भारतयात्रा कंपनीचे मालक किसन कपूर यांना जाब विचारण्यास सुरु वात केली.
कपूर यांनी नव्याने तिकीट काढत असल्याचे सुरुवातीला सांगितले. मात्र, काही वेळात कपूरही विमानतळावरून गायब झाला. त्याने फोनही बंद ठेवल्याने आपली फसवणूक झाल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले. या २४२ जणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती. तर अनेक जण पहिल्यांदाच विमानात बसणार असल्याने आनंदात होते. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे अनेकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आयोजनात पुढाकार घेतलेल्या सुरेश महाराज पाटील यांच्या ही बाब लक्षात आल्यावर, त्यांनी श्रीलंकेवरून परतीचा प्रवास करीत चेन्नई विमानतळ गाठत २४२ प्रवाशांना रेल्वेने पुन्हा पनवेलला आणले. दरम्यान, संतप्त झालेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
श्रीलंकेत ४ दिवस ५ रात्री अशी सहल नेण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून २२ हजार रुपये आकारण्यात आले होते. ३५० पर्यटकप्रमाणे ही रक्कम सुमारे ७७ लाख रु पये होते. सुमारे २४२ जणांना चेन्नई वरूनच परतीचा प्रवास करावा लागला. चेन्नईवरून श्रीलंकेसाठी रवाना झालेले १०८ पर्यटक ३ मार्च रोजी पनवेलमध्ये दाखल होणार आहेत.
आमदार पत्नीचाही समावेशपनवेलमधून श्रीलंकेसाठी रवाना झालेल्या पर्यटकांमध्ये कोकण शिक्षण मतदार संघातील आमदार बाळाराम पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचादेखील समावेश होता. १०८ पर्यटक श्रीलंकेला रवाना झाले, त्यामध्ये राजश्री पाटील याही होत्या. या प्रकारासंदर्भात आयोजकांना जाब विचारणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले.
मोठ्या विश्वासाने पनवेलवरून श्रीलंकेसाठी रवाना झालो होतो. मात्र, आमची फसवणूक झाली. २४ तास आम्हाला चेन्नई विमानतळावर ताटकळत थांबावे लागले. या वेळी आयोजकांनी आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. हा मोठा मानसिक धक्का होता.- हरिभाऊ म्हात्रे,पर्यटक, पनवेल