तुर्भे गावाला अवैध पार्किंगचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 07:18 AM2018-05-28T07:18:57+5:302018-05-28T07:18:57+5:30

तुर्भे गावाला अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. केवळ पार्किंगच्या निमित्ताने गावातील अरुंद रस्त्यावरून मोठी वाहने प्रवेश करत असताना तिथल्या प्राचीन रामतनू माता मंदिराच्या भिंतीला धडकत आहेत.

 Check illegal parking in Turbhe village | तुर्भे गावाला अवैध पार्किंगचा विळखा

तुर्भे गावाला अवैध पार्किंगचा विळखा

Next

नवी मुंबई - तुर्भे गावाला अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. केवळ पार्किंगच्या निमित्ताने गावातील अरुंद रस्त्यावरून मोठी वाहने प्रवेश करत असताना तिथल्या प्राचीन रामतनू माता मंदिराच्या भिंतीला धडकत आहेत. यामुळे मंदिराच्या भिंतीला तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
नवी मुंबईत पार्किंगची सर्वाधिक मोठी समस्या भेडसावत असतानाच मूळ गावांनादेखील त्याचा विळखा बसत चालल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारातून तुर्भे गावातील ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होण्याच्या स्थितीत आहे. वाहन पार्किंगच्या नियोजनाअभावी शहरातल्या सर्वच रस्त्यांवर अवैध पार्किंग पाहायला मिळत आहे. परंतु पार्किंगची सोय असतानादेखील त्या ठिकाणचे शुल्क वाचवण्यासाठी अनेक जण रस्त्यावर वाहने उभी करतात. हाच प्रकार तुर्भे गाव व परिसरात जागोजागी पाहायला मिळत आहे. रामतनू माता मंदिरासमोरील तलावाभोवती मोठ्या प्रमाणात टेम्पो, रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. ही सर्व वाहने मॅफको मार्केटमधील असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्याचा निम्म्यापेक्षा अधिक भाग अडवला जात असल्याने इतर वाहनांना रहदारीला अडथळा होत आहे. परिणामी, अपुऱ्या जागेतूनदेखील मोठी वाहने घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये रस्त्यालगतच्याच रामतनू माता मंदिराच्या सुरक्षा भिंतीला वाहनांच्या धडका लागून जागोजागी भिंतीला तडे गेले आहेत. यावरून वाहनचालक व ग्रामस्थांचे वाद होत आहेत. त्यानंतरही परिसरातील रस्त्यावर उभी करण्यासाठी जड, अवजड वाहने त्या ठिकाणी येत आहेत.
सामंत विद्यालयाच्या मागच्या बाजूला पेट्रोलसह इतर ज्वलनशील साठा असलेली वाहने उभी केली जात आहेत. त्याच ठिकाणी वाहन दुरुस्तीचीदेखील कामे सुरू असतात. लगतच दोन पेट्रोलपंपदेखील असल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एखाद्या ज्वलनशील पदार्थांच्या वाहनाने पेट घेतल्यास संपूर्ण तुर्भे गावाला धोका उद्भवू शकतो. अशावेळी परिसरातील रस्त्यावरील दुतर्फा अवैध पार्किंगमुळे अग्निशमन दलाची गाडीदेखील घटनास्थळी पोहचू शकणार नाही याचीही भीती ग्रामस्थांना सतावत आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाभोवतीच हा संपूर्ण प्रकार पाहावयास मिळत आहे. सेक्टर २१ परिसरात मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळींचे दोन ते तीन मजली घरांमध्ये रूपांतर झाले आहे. त्यांचीही वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असतानाच, फेरीवाल्यांनीदेखील रस्त्याचा उर्वरित भाग बळकावला आहे. यासंदर्भात अनेकांनी तक्रार करूनदेखील वाहतूक पोलिसांसह पालिका अधिकाºयांकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

तुर्भे गावासह परिसरातील रस्त्यांवर अवैधरीत्या जड, अवजड वाहने उभी केली जात आहेत. यामुळे रहदारीला अडथळा होत असून स्थानिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय पार्किंगसाठी तुर्भे गावात येणारी वाहने रामतनू माता मंदिराच्या भिंतीला धडकून जागोजागी भिंतीला तडे गेले आहेत. भविष्यात एखाद्या वाहनाच्या धडकेने ही भिंत कोसळल्यास ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे वेळीच तुर्भे गाव अवैध पार्किंगच्या विळख्यातून मुक्त झाले पाहिजे.
- सचिन पाटील, तुर्भे ग्रामस्थ
 
तुर्भे गावांप्रमाणेच शहरातील बहुतांशी गावांना बेकायदा पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. गावातील रस्ते अगोदरच अरूंद व त्यात मोठ्याप्रमाणात बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे उभारली आहेत. अरूंद रस्त्यावर ट्रक, टेम्पो, खासगी वाहने उभी केली जात असल्याने दळवळणाला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

Web Title:  Check illegal parking in Turbhe village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.