पनवेल पालिका प्रदूषणाची पातळी तपासणार, सुधाकर शिंदे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:19 AM2017-12-03T02:19:48+5:302017-12-03T02:20:07+5:30
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीपैकी एक असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवाप्रदूषण वाढत चालले आहे.
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीपैकी एक असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवाप्रदूषण वाढत चालले आहे. या प्रदूषणामुळे घातक रसायने हवेद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करीत असतात. यामुळे कॅन्सर सारख्या रोगाची लागण होण्याची भीती आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी पनवेल महानगरपालिका चार रियल टाइम मॉनेटरिंग मशिन विकत घेऊन त्या चार शहरांत बसवणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी खारघर येथे शनिवारी पार पडलेल्या बैठकीत दिली.
खारघर शहरातील कचरा वर्गीकरण, तसेच नजीकच्या तळोजा औद्योगिक वसाहतीमधून होणाºया प्रदूषणाच्या तक्रारीसंदर्भात या बैठकीचे आयोजन पालिकेच्या खारघर विभागीय कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीला आयुक्त शिंदे यांच्यासह नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक रामजी भाई बेरा, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, नगरसेविका भारती विश्वनाथ चौधरी, आरती नवघरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी प्रदीप डोके, श्रीराम हजारे आदीसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते. या वेळी शहरातील विविध ठिकाणी साचणारा कचरा, कचºयाचे वर्गीकरण या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आपल्या प्रभागातील नगरसेवकांशी संपर्क साधून आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही आयुक्तांनी उपस्थितांना केले.
सध्याच्या घडीला तळोजा आौद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा शहरांत मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने येथील नागरिक त्रस्त आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये ९००पेक्षा जास्त कारखाने आहेत. मात्र, या कारखान्यांमार्फत रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात प्रदूषित वायू हवेत सोडले जाते, अशी तक्रार नागरिकांनी केली. या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे योग्यरीत्या नियंत्रण नसल्याचे वायुप्रदूषण वाढत चालले आहे. या बैठकीत आयुक्त डॉ. शिंदे यांनी तत्काळ पालिका प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी मशिन विकत घेणार असल्याचे जाहीर केले. ही रियल टाइम मॉनेटरिंग मशिन पाच ते सहा लाखांच्या घरात आहे. खारघर, कळंबोली, कामोठे शहरांत मध्यवर्ती ठिकाणी या मशिन बसवल्या जातील, तसेच प्रदूषणासंदर्भात सर्व माहिती प्रत्येक शहरातील नागरिकांना देण्यात येईल. तसेच दोषी कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाºयाने काढला पळ
या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाचे अधिकारी प्रदीप डोके हे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी वसाहतीमधील चार कारखाने रात्रीच्या वेळेला बंद करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी त्यांना या कारखान्यांची माहिती देण्यास सांगितल्यावर त्यांनी मला पत्रकारांना माहिती देण्याचे आदेश नसल्याचे सांगत, या ठिकाणाहून पळ काढला.
प्रदूषण थांबले नाही, तर संपूर्ण औद्योगिक वसाहतच बंद करावी लागेल
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण चिंतेची बाब आहे. येथील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे सीईटीपी प्लांट बंद असेल, तर इंडस्ट्री चालूच कशी काय राहू शकते? असा सवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी प्रदीप डोके यांना या वेळी विचारण्यात आला.
लोकांच्या जीवाशी खेळायच असेल, तर इंडस्ट्री या ठिकाणी राहू दे नाय तर लोकांना या ठिकाणी राहू दे, असे सांगत एकप्रकारे इंडस्ट्रीचा बंद करण्याचे संकेत आयुक्त शिंदे यांनी या वेळी दिले. यावर उत्तर देताना डोके यांनी, प्रदूषण करणारे चार कारखाने आम्ही रात्रीच्या वेळेला बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.