उत्साही पक्षिप्रेमींमुळे पामबीच रोडवर अपघातांना मिळतेय आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 04:46 AM2020-01-30T04:46:53+5:302020-01-30T04:47:01+5:30
अपघात टाळण्यासाठी वेळेत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नवी मुंबई : पामबीच रोडवर नेरुळ व सानपाडा दरम्यान पक्ष्यांसाठी धान्य टाकले जात आहे, यामुळे गत आठवड्यात दोन किरकोळ अपघात झाले असून, भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघात टाळण्यासाठी वेळेत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नवी मुंबईमधील प्रमुख रस्त्यांमध्ये पामबीच रोडचा समावेश आहे. वाशी ते किल्ला-गावठाण दरम्यान या रोडवर वेगाने वाहने जात असतात. या रोडवर पादचाऱ्यांना जाण्यास मनाई आहे. फेरीवाले व इतर व्यावसायिकांनाही या रोडवर थांबण्यास बंदी घातली आहे. काही महिन्यांपासून नेरुळ ते सानपाडा दरम्यान वाशीकडे जाणाºया रोडवर दोन मोरींवर पक्ष्यांसाठी खाद्य टाकले जात आहे. यामुळे कबुतर व कावळ्यांचा पामबीचवर वावर वाढला आहे. पक्ष्यांचा थवा रोडच्या मध्ये येत असल्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत आहे. गत आठवड्यामध्ये दोन मोटारसायकल घसरून किरकोळ अपघातही झाला आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पामबीच रोडवर पक्ष्यांना खाद्य टाकण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी या पूर्वीही प्रवाशांनी केली आहे. पामबीचऐवजी इतर सुरक्षित ठिकाणी पक्ष्यांसाठी खाद्य टाकण्यात यावे, अशी मागणीही केली होती. महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनीही या ठिकाणी सूचना फलक लावावे, अशी मागणी केली होती; परंतु प्रशासनाने अद्याप या मागणीची दखल घेतलेली नाही. अशीच स्थिती राहिली व भविष्यात अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
पामबीच रोडवर वर्षभर अनेक गंभीर अपघात होत असतात. नेरुळ व सानपाडादरम्यान पक्ष्यांना खाद्य टाकल्यामुळे पक्ष्यांचे थवे येथे जमा होत असून, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाने पक्षिप्रेमींना आवाहन करून येथे धान्य टाकण्यापासून मनाई केली पाहिजे.
- विनय मोरे, प्रवक्ता, सारथी सुरक्षा
पामबीच रोडवर पक्ष्यांना धान्य टाकल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असेल तर त्याविषयी पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जातील, याविषयी योग्य खबरदारी घेतली जाईल.
- सुभाष सोनावणे,
कार्यकारी अभियंता, महापालिका
पामबीच रोडवर पक्ष्यांसाठी धान्य टाकले जात असेल तर त्याची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील. पक्षिप्रेमींनाही पामबीचऐवजी इतर ठिकाणी धान्य टाकण्याचे आवाहन केले जाईल. येथे सूचना फलक लावण्यासाठी सूचना दिल्या जातील.
- सुनील लोखंडे,
उपायुक्त, वाहतूक पोलीस