चेंबूरच्या टोळक्याची नेरूळमध्ये हाणामारी; दोघांना अटक
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 5, 2024 05:40 PM2024-03-05T17:40:03+5:302024-03-05T17:40:53+5:30
आईचे पैसे चोरल्याचा संशयातून घेणार होते जीव
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नेरुळ येथे एका तरुणावर चार जणांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. यावेळी पार्किंग कर्मचारी व इतरांच्या मदतीने जखमीचे प्राण वाचले होते तर हल्ला करणाऱ्या एकाला पकडले होते. हे सर्वजण चेंबूरचे असून केवळ हल्ल्याच्या उद्देशाने एकाचा पाठलाग करत रेल्वेने नेरूळला आले होते.
नेरुळ स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये शनिवारी रात्री हि घटना घडली. त्याठिकाणी एका तरुणावर काहीजण कोयता, दांडके व दगडाने हल्ला करत होते. यामध्ये जखमी तरुण बचावासाठी धावत एका वाहनाखाली घुसला असताना देखील हल्लेखोर त्याच्यावर वार करत होते. हा प्रकार पाहून तिथल्या पे अँड पार्किंगमध्ये काम करणाऱ्या मुकीम उस्मानी याने आरडा ओरडा करत सदर तरुणाच्या बचावासाठी धाव घेतली. त्याचवेळी इतरही नागरिक धावून आले असता हल्लेखोर पळू लागले. यामुळे मुकीम याने पळणाऱ्या एकाच्या दिशेने बांबू फेकून त्याला पाडून पकडून ठेवले. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल करून पकडलेल्या हल्लेखोराला ताब्यात घेतले होते.
अधिक चौकशीत जखमीचे नाव हर्ष खरे (२०) असून तो व हल्ला करणारे चेंबूरचे असल्याचे समोर आले. हर्ष याने आपल्या आईचे पैसे चोरून तिची छेड काढल्याचा साहिल परघरमोर (२२) याचा आरोप आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील आहे. मात्र या प्रकरणात साहिल हा हर्षचा कायमचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो संधीच्या शोधात असताना शनिवारी रात्री हर्ष हा पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वेत चढताना दिसला. याचवेळी साहिल देखील त्याच्या साथीदारांसह बॅगेत कोयता घेऊन त्याच रेल्वेतुन त्याच्या पाठोपाठ आला होता. नेरुळ स्थानकात हर्ष उतरून स्थानकाबाहेर निघताच साहिल व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे थोडक्यात हर्षचे प्राण वाचले. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असता एक अल्पवयीन असल्याचे समोर आले. उर्वरित साहिल व इतर एकाला अटक केली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले.
रेल्वेतून आणली हत्यारे.
हर्षच्या मागावर आलेल्या साहिल व साथीदारांनी बॅगेत हत्यारांसह रेल्वेतून प्रवास करत नेरुळ गाठले. यापूर्वी पण सीबीडी येथे मुलांच्या दोन टोळ्यात झालेल्या हाणामारीत मानखुर्द परिसरातील मुलांनी हत्यारांसह रेल्वेने सीबीडी गाठले होते. यावरून रेल्वे प्रवास्यांचा प्रवास सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.