उरण : उरण -पनवेल बायपास मार्गावरील धुतूम ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आयओटीएल कंपनीजवळ घातक रसायन वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला. रस्त्यावर रसायन सांडल्याने उग्र वासाने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. सिडकोचे अग्निशमन दल व पोलिसांनी त्वरित अपघातस्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
उरण-पनवेल बायपास मार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास एक घातक केमिकल वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला. रस्त्यावर सांडलेल्या रसायनाच्या उग्र दर्पाने परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याशिवाय डोळ्यांची जळजळ, मळमळ सुरू झाली.
धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा ठाकूर यांनी ही बाब उरण पोलिस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनीही तत्काळ सिडकोच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेला कंटेनर उचलण्यात आल्याने पुढील अनर्थ टळल्याची माहिती न्हावा- शेवा बंदर विभागाचे एसीपी विठ्ठल दामगुडे यांनी दिली.