नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या रसायनमिश्रित पाणी जुईनगरमधील नाल्यात सोडत आहेत. यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत असून रात्री या परिसरात दुर्गंधी पसरत आहेत. प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवी मुंबईमधील प्रदूषणामध्ये वाढ होऊ लागली असून देशातील सर्वाधिक प्रदूषण असणाऱ्या शहरांमध्ये समावेश होऊ लागला आहे. औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार नियमांचे पालन करत नसल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी कोपरीमधील नाल्यातून रसायनमिश्रित पाणी सोडले जात होते.
कोपरी, तुर्भे, कोपरखैरणे परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. माजी मंत्री गणेश नाईक यांनी शिष्टमंडळासह जाऊन निवेदन दिले होते. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने भरारी पथक तयार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यानंतरही नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडण्याचे प्रकार सुरूच आहेत.