कोपरी नाल्यात केमिकलचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:51 AM2018-04-26T03:51:42+5:302018-04-26T03:51:42+5:30
दुर्गंधीने नागरिक हैराण : प्रक्रिया न करताच सांडपाणी नाल्यात
नवी मुंबई : एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया न करताच कोपरी नाल्यात सोडण्यात येत आहे. दूषित पाण्यांमुळे परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरू लागली असून, श्वास घेणेही अशक्य झाले आहे. प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कंपन्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पावणे येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. नेरुळ, शिरवणे परिसरातील पाणी तुर्भेमधील साठवण ठाकीत साठवून ते पाइपद्वारे प्रक्रिया केंद्रामध्ये घेऊन जाणे बंधनकारक आहे; परंतु अनेक वेळा तुर्भेमधील पाणी जुईनगरच्या नाल्यात सोडले जाते व पावणे परिसरातील सांडपाणी कोपरीच्या नाल्यात सोडून दिले जात आहे. काही दिवसांपासून कोपरी नाल्यातून केमिकलमिश्रीत पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे कोपरखैरणे सेक्टर ११, बालाजी गार्डन ते कोपरखैरणे होर्डिंग पाँडपर्यंत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. सेक्टर ११मध्ये नाल्याच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे; परंतु दुर्गंधीमुळे या परिसरातून जाणे अशक्य होऊ लागले आहे. एमआयडीसीमधील प्रदूषण पसरविणाºया कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करू लागले आहेत.
महापालिकेच्या पर्यावरण समितीच्या सभापती दिव्या वैभव गायकवाड यांनी एक वर्षापासून सातत्याने प्रदूषण करणाºया कंपन्यांविरोधात आवाज उठविला आहे. महापालिका आयुक्त, एमआयडीसी अधिकारी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र हाताळणारे व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. प्रदूषण पसरविणाºया कंपन्यांची यादीही देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. आ. संदीप नाईक यांनीही दौरा करून एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळ व्यवस्थापनाला धारेवर धरले होते. याविषयी विधानसभेतही आवाज उठविला होता. काही दिवस दूषित पाणी खाडीत टाकणे बंद झाले होते; परंतु आता पुन्हा मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जात असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.
प्रदूषण करणाºया कंपन्यांविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठविला आहे. कारखान्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. ज्या कंपन्या दूषित पाणी नाल्यात सोडत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
- दिव्या वैभव गायकवाड, सभापती पर्यावरण समिती