‘टाटा’त होणार आता ३० हजार रुग्णांवर केमो, खाटांची संख्या दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 09:01 AM2023-02-12T09:01:17+5:302023-02-12T09:02:42+5:30

खाटांची संख्या दुप्पट : वर्षाला १० हजार शस्त्रक्रिया

Chemo will now be done on 30 thousand patients in Tata | ‘टाटा’त होणार आता ३० हजार रुग्णांवर केमो, खाटांची संख्या दुप्पट

‘टाटा’त होणार आता ३० हजार रुग्णांवर केमो, खाटांची संख्या दुप्पट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघरमधील टाटा मेमोरियल रिसर्च ॲन्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आधुनिक उपचार लक्षात घेता हेमॅटोलिम्फॉइड कॅन्सर सेंटर, ब्लड कॅन्सरच्या रुग्णांची पूर्तता करणारे देशातील सर्वांत मोठे केंद्र या ठिकाणी २०२४च्या अखेरीस कार्यान्वित केले जाणार आहे. १९ ऑपरेशन थिएटरमुळे दरवर्षी अंदाजे दहा हजार मोठ्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियांसह ५ हजार रुग्णांना रेडिएशन थेरपी,  २५ ते ३० हजार रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकणार असून, जवळपास ३ लाख २० हजार रुग्ण औषधोपचार घेऊ शकणार आहेत.

कर्करोगावर उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून रुग्ण खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात येतात. आता खाटांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खाटांसह आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याची मागणी टाटा हॉस्पिटलच्या विनंतीनुसार केली होती. यानंतर केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याशी संवाद साधून पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार टाटा हॉस्पिटलमधील मनुष्यबळ १०६७वरून २४०५, तर खाटांची संख्या ४००वरून ९३० करण्यात येणार असल्याचे बालदी यांनी सांगितले.

तीन महिन्यांत घेतला निर्णय

  या हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत दोन इमारती म्हणजेच रेडिएशन रिसर्च युनिट आणि महिला-मुलांचे कर्करोग केंद्र कार्यान्वित आहे. 
  त्यामध्ये आता वैद्यकीय, नर्सिंग, तंत्रज्ञ, सुरक्षा, हाउसकिपिंग आणि प्रशासकीय अशा सर्व श्रेणींच्या कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. 
  कर्करोग रुग्णांची परिस्थिती आणि उपचार या संदर्भात टाटा हॉस्पिटलचे डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी चर्चा केली होती. 
  त्या अनुषंगाने नोव्हेंबर २०२२ मध्ये या संदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वाढीव रुग्ण बेड आणि आणि मनुष्यबळाची मागणी केली होती. 
  त्यानुसार अवघ्या तीन महिन्यांत तातडीने निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचा दावा आमदार महेश बालदी यांनी केला.

Web Title: Chemo will now be done on 30 thousand patients in Tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.