छत्रपती उदयनराजे सुद्धा तुमच्या मिशीला घाबरतात: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 06:24 PM2019-09-25T18:24:45+5:302019-09-25T18:24:59+5:30
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट (कांदा- बटाटा मार्केट) येथे स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची 86वी जयंती व माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता
नवी मुंबई: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट (कांदा- बटाटा मार्केट) येथे स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची 86वी जयंती व माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मोळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या मिशीला साताऱ्याचे उदयनराजे भोसले देखील घाबरत असल्याचे वक्तव्य या मेळ्याव्यात केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यातील भाषणात म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देऊन सरकारने स्व. अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली व्हायली आहे. येत्या काळात माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी नरेंद्र पाटील यांनी मी यापुढे राहील नाही राहील असं वक्तव्य केले होते. मात्र आता कामगारांच्या चळवळीला 50 वर्ष पूर्ण झाली, पण चळवळीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्ही या मंचावर असाल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांना बोलून दाखविला. त्याचप्रमाणे उदयनराजेंनी मला सांगितले होते की मला दोन व्यक्तीच्या मिशीची भीती वाटते त्यामध्ये नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे छत्रपतींनीचं असं सांगितल्याने तुम्हाला काळजी करायची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांना सांगितले.
तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून युती होणारच, असे ठणकावून सांगितले. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर जयवंत सुतार, सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार संदीप नाईक व विविध मान्यवरांची उपस्थिती होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सानपाडा पामबीच येथील सेक्टर - 17मध्ये वडार समाज राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या पुढाकाराने उभारलेल्या राज्यातील पहिल्या वडार भवनाला सदिच्छा भेट दिली.