पोलिसांच्या आरोग्यावरून महासंचालकांचा घरचा अहेर

By admin | Published: April 18, 2017 06:49 AM2017-04-18T06:49:13+5:302017-04-18T06:49:13+5:30

पोलीस खात्याचा कारभार लेट लतिफ असल्याचा घरचा अहेर पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिला आहे. पोलिसांचे मानसिक

Chief of the Director General's Home on Police Health | पोलिसांच्या आरोग्यावरून महासंचालकांचा घरचा अहेर

पोलिसांच्या आरोग्यावरून महासंचालकांचा घरचा अहेर

Next

नवी मुंबई : पोलीस खात्याचा कारभार लेट लतिफ असल्याचा घरचा अहेर पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिला आहे. पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ राखण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या आय कॉल या हेल्पलाइनच्या उद्घाटनप्रसंगी ते सीबीडी येथे उपस्थित होते. तसेच तीन वर्षे पाठपुरावा करूनही मंजूर न झालेली आरोग्य योजना स्वत: महासंचालक झाल्यावर अमलात आणल्याचेही त्यांनी सांगितले.
मागणी करूनही वेळेवर सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून पोलीस खात्यातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी खात्याच्या कारभारावर नाराज आहेत. अशातच पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनीही खात्याला घरचा अहेर दिला आहे. सीबीडी येथे कार्यक्रमप्रसंगी माथुर यांनी उदाहरणे देत खात्याचा कारभार लेट लतिफ असल्याची खंत व्यक्त केली. माथुर यांच्या प्रयत्नाने राज्यातील पोलिसांकरिता समुपदेशन हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे. राज्य पोलीस व टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य योजना राबवली जात आहे. त्याचे उद्घाटन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते सीबीडी येथे करण्यात आले. मात्र ही योजना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. मानसिक तणावातून घडणाऱ्या आत्महत्येच्या घटना टाळण्याच्या उद्देशाने पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राखणाऱ्या आरोग्य योजनेची संकल्पना सुचली होती. परंतु तीन वर्षे पाठपुरावा करूनही अपयश आले. अखेर स्वत: पोलीस महासंचालक झाल्यानंतरच ही योजना यशस्वीरीत्या राबवू शकल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, संजयकुमार सिंघल, प्रज्ञा सरवदे, सह आयुक्त मधुकर पांडे, टाटा इन्स्टिट्यूटच्या संचालिका अपर्णा जोशी आदी उपस्थित होते.
अनेकदा एक दुसऱ्याच्या वागण्याच्या पद्धतीवरून हिणवल्यामुळे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होवू शकतो. शिवाय प्रत्येकाच्या वागण्याची पध्दत भिन्न असल्यामुळे आपल्या विचाराप्रमाणे दुसरा वागेल अशी अपेक्षाच गैर असल्याचेही माथुर यांनी सांगितले. अशातच पोलीस खात्यात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता असल्यामुळे टिसच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांवर मानसिक ताण असल्यास त्यांना अवघ्या फोनवरून पोलिसांचे समुपदेशन करता यावे याकरिता आय कॉल ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ०२२ २५५२११११ या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या पोलिसांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्याप्रमाणे ताप, थंडी, सर्दी या आजारांवर उघडपणे डॉक्टरकडून उपचार घेतले जातात. त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यास देखील वेळीच तज्ज्ञाकडून उपचार करून घेण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Chief of the Director General's Home on Police Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.