आयुक्तांच्या बदलीप्रकरणी अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By admin | Published: March 25, 2017 01:39 AM2017-03-25T01:39:38+5:302017-03-25T01:39:38+5:30
पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली केल्याने त्या निषेधार्थ पनवेलमध्ये महापालिका संघर्ष समितीच्या
पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली केल्याने त्या निषेधार्थ पनवेलमध्ये महापालिका संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सह्यांची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. या वेळी शिंदे यांच्या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त करत येत्या सोमवारी (२७ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन हजारे यांनी दिले.
सनदी अधिकाऱ्यांची मुदतपूर्व बदली करणे लोकशाहीला परवडणारे नाही. राजकीय संबंध जोडून बदली केली गेली, तर तो राजकीय घराण्यांवर अन्याय होईल. त्या घरातून उद्या सनदी अधिकारी तयार होणार नाही, असे हजारे यांनी सांगितले.
येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येत असल्याने पनवेलकरांचे म्हणणे त्यांच्याकडे मांडणार असल्याचे आश्वासन अण्णांनी शिष्टमंडळाला दिले.
संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली सल्लागार शिवाजीराव थोरवे, खजिनदार रूपा सिन्हा, सचिव यतिन देशमुख, अॅड. आर. के. पाटील, उज्ज्वल पाटील, पराग बालड, संतोषी मोरे, भावना प्रसाद, किशोर ठोंबरे, हबिबा सय्यद, सन्नाउल्ला सय्यद, सुधीर शेट्टी आदींनी अण्णांची भेट घेतली. (वार्ताहर)