नवी मुंबई : डोंबविली परिसरातील भाविकांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोलापूर आणि पंढरपूरदौऱ्यातील व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मंगळवारी दुपारी तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयास धावती भेट देऊन जखमींची विचारपूर केली. तसेच झालेला अपघात दुर्दैवी असून यातील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रुग्णालयात दाखल जखमींचा प्रत्यक्ष भेटून अपघात नेमका कसा झाला, याची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याच्या सुचना तेथील डॉक्टरांना केल्या. रुग्णालयात सर्व उपचारांची सोय असली तरी गरज पडली तर गंभीर जखमींना मुंबईला नेण्यात येईल, असे सांगितले.
दोषींवर होणार कारवाई
मुंबई-द्रुतगती महामार्गावर ट्रक्टर नेण्यास मनाई आहे. असे असताही तो गेल्यानेच हा अपघात झाला, याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता ही बाब गंभीर असून याची चौकशी करण्यात येईल. त्यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यानी सांगितले.