पनवेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचे निवासस्थान असलेले संग्रामला शनिवारी भेट दिली. पालिकेच्या पोदी येथील शाळेत 5 जी सेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे पनवेलमध्ये आले होते.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता.स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तत्कालीन ठाकरे सरकार विरोधात मोठा रोष निर्माण झाला होता. राज्यात राजकारण तापले असताना ठाकरे सरकारे अचानक दिबांच्या नावाचा ठराव केला.शिंदे फडणवीस सरकारने हाच ठराव नव्याने करून या ठरावाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले.विधानसभासभेत देखील बहुमताने हा ठराव मंजुर झाल्यावर प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला.मागील वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पनवेल शहरातील दिबांच्या निवासस्थानाला भेट दिली होती.याचा भेटीचा कित्ता गिरवत मुख्यमंत्री शिंदे यांनी पनवेल मधील दिबांच्या संग्राम निवासस्थानाला भेट देत दिबांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकुर,जगदीश गायकवाड,दिबांचे सुपुत्र अतुल पाटील,जे डी तांडेल,राजेश गायकर आदींसह दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत दिबांच्या आठवणींना देखील उजाळा देण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीची चर्चा -नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबां पाटील कि हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून शिवसेना विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा संघर्ष निर्माण झाला.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर ठाम होते.यासंदर्भात वर्षा निवासस्थानावर प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाच्या दोन बैठका पार पडल्या.या बैठका निष्फळ ठरल्या.एका बैठकीतून उद्धव ठाकरे तर बैठक सोडून उठून गेल्याने या बैठकीची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिबांच्या निवासस्थानी प्रकल्पग्रस्त नेत्यांनी काढली.